बँकेच्या हितासाठी कोणाची गय नाही

By Admin | Updated: June 1, 2015 00:51 IST2015-06-01T00:51:17+5:302015-06-01T00:51:38+5:30

हसन मुश्रीफ यांचा इशारा : जिल्हा बॅँक कर्मचाऱ्यांचा मेळावा

Who does not deserve any benefit for the bank? | बँकेच्या हितासाठी कोणाची गय नाही

बँकेच्या हितासाठी कोणाची गय नाही

कोल्हापूर : बदल्यांसाठी कोणी भेटायचे नाही, युनियनला सहा महिने वेळ मिळणार नाही, भूतकाळ विसरून कामाला लागा, कारण कोणत्याही परिस्थितीत बॅँकेला ‘नंबर वन’ बनवायचे, असा संकल्प व शपथ घेत, कडक धोरण राबविल्याने विधानसभेत मते कमी पडली तरी बेहत्तर पण कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना दिला. पीक कर्जातून ५ टक्के ठेव घेण्याचा निर्णयही यावेळी जाहीर केला. कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी बॅँकेच्या शाहूपुरी येथील मुख्य कार्यालयात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
एनपीए वाढल्याने प्रशासक नियुक्तीचा लाजीरवाणा प्रसंग बॅँकेवर आल्याचे सांगत अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना बिनव्याजी १ लाख तर २ टक्क्यांनी ३ लाखांपर्यंत पीककर्ज दिले जाते. त्यामुळे तोट्याचे कर्ज वाटप वाढत आहे, त्यामुळे या कर्जवाटपातून ५ टक्के ठेव पाच वर्षांच्या मुदतीने घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तोट्यातील शाखा बाहेर काढण्याची जबाबदारी प्रतापसिंह चव्हाण व डॉ. ए. बी. माने यांच्यावर सोपविली आहे. पुणे बॅँकेचा प्रति कर्मचारी पाच कोटी व्यवसाय आहे, आपला त्या पटीत होण्यासाठी कामाला लागा. कार्यालयीन शिफारसीशिवाय एक कर्जही मंजूर केले जाणार नाही. उचल देताना कागदपत्रे नीट तपासून बघा, थकबाकीच्या वसुलीसाठी संचालक पुढे असतील, कोणाचीही गय नाही. थकीत कर्जाची वसुली न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे, यासाठी वकिलांची बैठक घेऊन लवकर निकालात काढण्याची सूचना केली आहे. काही करून दोन वर्षांत बॅँकेला गतवैभव मिळवून द्यायचे आहे, कारभारात एकही चूक आम्ही करणार नाही, तुम्हीही करू नका, माझ्या कारभारातील चूक दाखवून द्याल त्यादिवशी पायउतार होऊ. कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नसल्याचेही त्यांनी सांगिंतले.
प्रतापसिंह चव्हाण म्हणाले, रिझर्व्ह बॅँकेचे निकष पूर्ण केले पण वसुलीला गती घेतली नाही, याचे आत्मपरीक्षण करा. फेबु्रवारी महिन्यात चारशे कोटींच्या ठेवी गोळा केल्या, असे हंगामी काम करून चालणार नाही. पीक कर्जवाटप करताना काळजीपूर्वक करा, कामाच्या वेळी रजा टाकण्याची पद्धत बंद करा, बॅँक तुमच्यासाठी आहेच पण त्यापेक्षा तुम्ही बॅँकेसाठी आहात याची जाणीव ठेवा, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. उपाध्यक्ष अप्पी पाटील, के. पी. पाटील, अनिल पाटील, सर्जेराव पाटील, निवेदिता माने यांनी मार्गदर्शन केले. विलास गाताडे, बाबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.

कोण संघटना बघतो...!
सांगली जिल्हा बॅँकेचे कर्मचारी साडेनऊ वाजता बॅँकेत येतात त्यांच्या ठेवी तीन हजार कोटींवर आहेत. आपणाला लाज वाटली पाहिजे, उद्यापासून सकाळी दहा वाजता बॅँक उघडली पाहिजे, कोण संघटना बघतो, अशी तराटणी मुश्रीफ यांनी दिली.


५अमर काकडे निलंबित
मेळावा सुरू असताना सोंडोली शाखेतील कर्मचारी अमर काकडे हे संचालकांसमोर कमरेवर हात ठेवून उभे होते. मध्येच ते तेथून निघून गेल्याने संतप्त झालेले अध्यक्ष मुश्रीफ यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मुश्रीफ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा तणाव जाणवत होता.


चार्ज करण्यासाठी रक्त आटवावे लागते
कर्मचाऱ्यांनी मनात आणले तर ठेवीचे उद्दिष्ट अशक्य नाही, त्यांना सारखे चार्ज करावे लागते आणि त्यासाठी रक्त आटवावे लागते, असा टोला चव्हाण यांनी हाणला.

दांडी मारणाऱ्यांचे पगार कापा
बॅँकेच्या आगामी घोडदौडीच्या दृष्टीने आजचा मेळावा महत्त्वाचा होता, पण काही कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे लक्षात आल्यानंतर गैरहजर राहणाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश मुुश्रीफ यांनी दिले.

चव्हाण यांचे गुण आत्मसात करा
ग्राहक हे आपले मालक आहेत, त्यांच्याशी सौजन्याने वागा, जरा प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांचे गुण घ्या, ते कसे गोड-गोड बोलतात, असा टोलाही के. पी. पाटील यांनी लगावला.


रोजंदारीच्या पगारवाढीचे संकेत
कर्मचाऱ्यांच्या पगारात विसंगती असल्याचे सांगत रोजंदारी कर्मचारी ऐंशी रुपयांत राबत आहेत. त्यांना कायम करायचे नंतर बघू, पण किमान वेतन तरी देणे गरजेचे होते. भांगलाय जाणाऱ्या मजुराला दोनशे रुपये हजेरी आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी लागेल, अशा शब्दांत के. पी. पाटील यांनी पगारवाढीचे संकेत दिले.


पीक पाहून कर्ज द्या
के. पी. पाटील : ठेवीची सक्ती कर्मचाऱ्यांनाही
कोल्हापूर : गेल्यावेळेला निर्णय चुकीचे झाल्याने बँक अडचणीत आली, केवळ सातबारा पाहून कर्जपुरवठा करू नका, प्रत्यक्ष पीक पहा आणि कर्ज द्या, शेतकऱ्यांकडून पीक कर्जातून ठेव घ्याच पण त्याबरोबर कर्मचाऱ्यांना पगार चांगले आहेत, त्यांनीही दर महिन्याला ठेव ठेवली पाहिजे, अशा सूचना जिल्हा बँकेचे संचालक के. पी. पाटील यांनी कर्मचारी मेळाव्यात रविवारी केली. आपल्या मिश्किल शैलीत त्यांनी प्रशासकापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे चांगलेच चिमटे काढत अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
कर्जमंजुरी देताना जागरूकता बाळगा. एक एकराची मंजुरी घ्यायची पण तेवढा ऊस नसतो. उचलीचा शोध घ्या, कमी टक्केवारी आमच्याकडून कर्ज घ्यायचे आणि दुसऱ्या बॅँकेत जास्त व्याजाने ठेव ठेवायचे असे प्रकार सुरू आहेत, त्याकडे लक्ष द्या, अशी सूचना त्यांनी केली.


आम्ही पांढऱ्या पायाचे?
निवडून आल्यानंतर कॅशच मिळेना, काही योजना बंद झाल्या, आम्हाला कोणी पांढऱ्या पायाचे म्हणू नये. तुम्हाला बोनस तर संस्थांना लाभांश नाही, हे गणित सोडविण्यासाठी ग्राहक सेवा, वसुली व ठेवी हेच उत्तर असल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले.
टक्कल म्हणजे धनवान
अध्यक्ष मुश्रीफ यांनी स्वखर्चातून बॅँकेच्या आवारात डांबरीकरण केल्याबद्दल कौतुक करत के. पी. पाटील म्हणाल, चिंध्या घालून सोने विकायला बसलो तर कोणी घेणार नाही. आमचेही तसेच आहे, डोक्यावर केस नसलेली माणसे फार धनवान व बुद्धिवान असतात, असा समज आहे. माझ्याबाबतीतही हेच असून तेच माझे भांडवल असल्याची मिश्किल टिपणी पाटील यांनी केली.

Web Title: Who does not deserve any benefit for the bank?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.