बोलोली वीज उपकेंद्र ठरतोय पांढरा हत्ती
By Admin | Updated: June 13, 2015 00:49 IST2015-06-13T00:40:57+5:302015-06-13T00:49:53+5:30
वीज उपकेंद्राचे काम निकृष्ट : दिवसातून ३ ते ४ तास वीज गायब; कोगेतून पूर्ववत लाईन जोडणी करा

बोलोली वीज उपकेंद्र ठरतोय पांढरा हत्ती
मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ --सांगरुळ, खाटांगळे, म्हारूळ, आमशीसह बारा वाड्या सदस्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. या ठिकाणी कळे येथून आसगाव उपकेंद्रातून लाईन जोडली आहे, पण या लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कमीत कमी गावांसाठी हे उपकेंद्र असूनसुद्धा दररोज बराच काळ वीज गायब असते.
बोलोली वीज उपकेंद्र पांढरा हत्ती ठरत असून बोलोली वीज उपकेंद्राच्या कामाची चौकशी व्हावी व तातडीने कोगे येथून पूर्वीप्रमाणे लाईन जोडावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
महावितरण कंपनीने कोगे येथील सबस्टेशनला विजेचा भार वाढत असल्याने कळे, आसगाव येथून २० किलोमीटर अंतर डोंगरातून नवीन लाईन टाकून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. सबस्टेशनच्या मुहूर्तापासून या लाईनमध्ये बिघाड असून गेली तीन वर्षे हे काम महावितरण कंपनीला दुरुस्त करता आलेले नाही. सुरुवातीच्या काळात आसगाव येथून वीजपुरवठा सुरू केल्यानंतर पोलवरील इन्शोलेशन (चीन मातीच्या प्लेट) फुटण्याचे सत्र सुरू होते. हे काम गेल्या वर्षभरात नव्याने पूर्ण केल्यानंतर आता तरी वीज मिळेल, अशी अशा नागरिकांना होती, पण सध्या येथे वेगवेगळ््या कारणांनी नेहमी वीज गायब असते. महावितरण कंपनी याची ट्रायल आणखी किती वर्ष घेणार अशी विचारणा शेतकरीवर्गांतून होत आहे.
सांगरुळ परिसरात खरिपाचे क्षेत्र जास्त असून भात, भुईमूग, सोयाबीन, मटकी, वरी, ज्वारी यांसारख्या पिकांच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतीला पाणी पाजण्याची लगबग सुरू आहे, पण विजेचा खेळखंडोबा नेहमी सुरू असल्याने उगवत सुरू असलेली बियाणे पाण्याअभावी वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतीसह घरगुती विजेचा ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर दळप- कांडप करतानाही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने महिलांही यामुळे त्रस्त झाल्या आहेत. कोगे येथून वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.
जाळपोळीची झलक परत होईल
चार वर्षांपूर्वी महावितरण कंपनीचा विजेचा खेळखंडोबा असाच सुरू होता. त्यावेळी त्रस्त नागरिकांनी अधिकाऱ्याला जाब विचारला असता, अधिकाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावत कार्यालयातील संपूर्ण साहित्य
पेटवले होते. महावितरण कंपनीने याची आठवण ठेवून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेकाला सामोरे जावे लागले.