मेरा फरान कहाँ हैं ?
By Admin | Updated: February 25, 2015 00:03 IST2015-02-24T23:58:16+5:302015-02-25T00:03:40+5:30
अस्वस्थ आईचा प्रश्न : बालक अपहरणाचा तपास संथ

मेरा फरान कहाँ हैं ?
एकनाथ पाटील -कोल्हापूर --दर्शन शहा या शाळकरी मुलाचा खंडणीसाठी खून, गांधीनगर येथील चिराग या बालकाचे खंडणीसाठी अपहरण, अशा गंभीर घटना गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ताज्या असताना दहा दिवसांपूर्वी कोल्हापुरातील टाऊन हॉल बागेतून अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या बालकाचा शोध लागलेला नाही. फरान ऊर्फ आयान अकिब जांभारकर (रा. सिद्धार्थनगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्याने अशा घटना घडू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुलाच्या अपहरणाच्या धक्क्याने आई-वडिलांनी अंथरूण धरले आहे. धीर देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक व पोलिसांना ते ‘मेरा फरान कहाँ हैं’, अशी हाक देत आहेत.भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणाहून बालकाचे अपहरण होऊनही लक्ष्मीपुरी पोलिसांचा तपास ‘कासवा’च्या गतीने सुरू आहे. अकिब मन्सूर जांभारकर मुळचे रत्नागिरीचे. वीस वर्षांपासून कोल्हापुरात सिद्धार्थनगराते राहतात. त्यांची टाऊन हॉलजवळ केळीची हातगाडी आहे. व्यवसायामध्ये पत्नीही हातभार लावते. कष्टकरी दाम्पत्यास दोन मुले. नवमान व फरान. नवमान सात वर्षांचा, तर फरान दोन वर्षांचा. पती-पत्नी केळीच्या गाड्यावर उभे राहत असल्याने मुले टाऊन हॉल बागेत खेळतात. सोमवारी(दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास फरान मुलांसोबत खेळत होता. दुपार नंतर तो गायब झाला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी त्याचा बागेत शोध घेतल्यावर तो आढळला नाही. त्यांनी त्याच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी तो घरी व आजूबाजूला चौकशी केली असता तो आढळला नाही. म्हणून लक्ष्मीपुरी पोलीसांत मंगळवारी (दि. १७) फिर्याद दिली. तेव्हापासून शोध सुरू असल्याचे सांगून पोलीस जबाबदारी झटकत आहेत, असे पालकांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या भिकाऱ्या महिलेने मुलाचे अपहरण केल्याची माहिती नातेवाइकांना पोलिसांना दिली; परंतु पोलिसांनी फार कांही केलेले नाही. नातेवाइकांचीच रेल्वे, बसस्थानकासह पंढरपूर, मिरज आदी ठिकाणी शोधाशोध सुरू आहे.
टोळीकडून अपहरणाची शक्यता
नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यात भीक मागण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या दिवसाढवळ्या लहान मलांचे अपहरण करीत असल्याची चर्चा आहे. त्याच टोळीकडून फरानचे अपहरण झाल्याची दाट शक्यता असल्याने रस्त्यावर एकटे मुलांना सोडणे धोक्याचे बनले आहे.