जनतेच्या सेवेत कुठे कमी पडलो ?

By Admin | Updated: January 14, 2015 01:27 IST2015-01-14T01:26:41+5:302015-01-14T01:27:20+5:30

सतेज पाटील यांचा सवाल : लाट इतरत्र का दिसली नाही; कार्यकर्त्यांचा मेळावा

Where did the service of the people fall? | जनतेच्या सेवेत कुठे कमी पडलो ?

जनतेच्या सेवेत कुठे कमी पडलो ?

कोल्हापूर : पंधरा वर्षे व्यवसायावर पाणी सोडले, संसार म्हटला नाही, जनतेच्या सुख-दु:खात सहभागी झालो. मागेल तेवढा निधी दिला, तरीही पराभव झाला. मी कुठे चुकलो, लाट होती तर इतर मतदारसंघांत कशी दिसली नाही, जनतेची सेवा करण्यात कुठे कमी पडलो, असे भावनिक सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
वॉटरपार्क येथे आज, मंगळवारी पाटील याच्ंया कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. विधानसभेतील पराभवानंतर हा पहिलाच मेळावा असल्याने कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती. इंदिरा गांधींपासून विलासराव देशमुख यांच्यापर्यंतच्या दिग्गजांचा पराभव झाला होता. त्यातून उभारी घेत ते सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. त्यामुळे पराभवाने खचून न जाता, सार्वजनिक कामाबरोबर वैयक्तिक कामांकडे लक्ष द्या, असे जयराम पाटील यांनी सांगितले. यावेळी पी. डी. पाटील, भरत रसाळे, निवास पाटील, आर. जी. जाधव, सचिन चव्हाण, बजरंग पाटील, बाबूराव गुरबे, बी. एम. पाटील, उमेश आपटे, मधुकर देसाई, विश्वास नेजदार यांनी मनोगत व्यक्त केले.
सतेज पाटील म्हणाले, गेले पंधरा वर्षे घरदार, व्यवसाय सोडून जनतेसाठी काम केले. २००९ ला मतदारसंघात नवखा होतो, त्यावेळी पराभव झाला असता तर मान्य केला असता. पाच वर्षे काम केले, संपर्क ठेवला, प्रश्न सोडविले मग चुकलो कुठे, त्यामुळे अनेक वेळा संयमाचा बांध फुटतो. पुन्हा काम करण्याची मानसिकता होत नाही. पूर्वी दहा गावे एका दमात करत होतो, आता चार गावे करू वाटत नाहीत. कंदलगावात गेलो असता प्रत्येक उंबऱ्यावर माझे स्वागत करण्यात आले. उचगावमध्ये दहा कोटींची कामे केली, लक्षतीर्थमध्ये प्रॉपर्टी कार्डे दिली, मग चुकले कुठे? मोरेवाडीत सतत संपर्क ठेवत पाणीप्रश्न संपविला, उजळाईवाडीतही कमी मतदान झाले, हे गणित कळले नाही. भावाची व पत्नीची साथ मिळाल्याने पूर्णवेळ राजकारण केले. कार्यकर्त्यांना दोष देणार नाही, माझे काहीतरी चुकले असेल, अशी मनाची समजूत घालत आहे. आता सक्रिय व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण ताकदीने मागे उभे राहणार असाल तर सक्रिय होतो, असेही पाटील यांनी बजावले. ‘गोकुळ’ चे संचालक बाबासाहेब चौगले, ऋतुराज पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष संजय खोत, प्रा. जयंत आसगांवकर, डी. आर. पाटील, उपमहापौर मोहन गोंजारे, पूनम जाधव उपस्थित होते.

कानाजवळच्यापासून सावध राहा
आपल्या जवळील अनेक कार्यकर्त्यांना आपणच मंत्री झाल्यासारखे वाटत होते. त्यांनी खाली बघितलेच नाही, त्यामुळेच फटका बसल्याचे किरणसिंह पाटील यांनी सांगितले. सशाच्या शिकारीला जाताना वाघाचे साहित्य घेऊन तुम्ही जाता, पण कानाजवळच्या माणसांपासून थोडे सावध राहा, असे सूचक वक्तव्य अशोक पाटील-चुयेकर यांनी केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
‘चंदगड’मधून आॅफर
‘चंदगड’मधून उभे राहा, आतापासून तुमच्यासाठी कामाला लागतो. तुम्हाला आमदार नाही केले तर बिंदू चौकात आम्हाला गोळ्या घाला, असे पी. डी. पाटील व बाबूराव गुरबे यांनी सांगितले.
आजही अंग थरथरते..!
सर्व काही सोडून जनतेसाठी अहोरात्र झटलो, पण पराभव पत्करावा लागला. सकाळी दोन तास व रात्री एक तास राजकारण करणारा मी नाही, विश्वासाने कामे केली तिथेच अडचणीत आलो. मेळाव्यातील भाषणे ऐकताना माझे अंग आजही थरथरते, असे पाटील यांनी सांगताच अनेकांचे डोळे पाणावले.

Web Title: Where did the service of the people fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.