पडळ रोहित्र दुरुस्ती भवनाचे घोडे अडले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:35+5:302021-08-21T04:28:35+5:30

यवलूज : २०१९ पाठोपाठ २०२१ मधील आलेल्या प्रलंयकारी महापुराने संपूर्ण पडळ उपकेंद्राशी संलग्न असणाऱ्या बहुतांश गावांतील विद्युत ...

Where did the horses of Padal Rohitra Durusti Bhavan stop? | पडळ रोहित्र दुरुस्ती भवनाचे घोडे अडले कुठे?

पडळ रोहित्र दुरुस्ती भवनाचे घोडे अडले कुठे?

यवलूज : २०१९ पाठोपाठ २०२१ मधील आलेल्या प्रलंयकारी महापुराने संपूर्ण पडळ उपकेंद्राशी संलग्न असणाऱ्या बहुतांश गावांतील विद्युत यंत्रणा कोलमडून पडली होती. ती सावरत असतानाच कासारी नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी कार्यान्वित असलेले शेकडो रोहित्र संच पुराच्या पाण्यात बुडाले असून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा रोहित्रांच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. बिघाड झालेल्या रोहित्र संचाच्या दुरुस्तीकामी सहा वर्षांपूर्वी पडळ सबस्टेशनला मंजूर झालेल्या रोहित्र दुरुस्ती भवनाचे घोडे नेमके अद्याप अडले कुठे, असा संतप्त सवालही विचारला जात आहे.

यंदाच्या महापुराने कासारी नदीकाठाच्या सर्व शेतकऱ्यांची सगळी पिके कुजून गेली असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पडळ उपकेंद्रात पडळ, यवलूज, माजगाव, शिंदेवाडी, खोतवाडी, माळवाडी, शिंदेवाडी, क॥ ठाणे, महाडिकवाडी, पुशिरे, म्हाळुंगे, माजनाळ, पुनाळ या गावांचा समावेश आहे. या भागातील कासारी नदीकाठावरील शेकडो रोहित्र संच पुराच्या पाण्याचे शिकार झाले आहेत. त्यांच्या कमी वेळेत दुरुस्तीकामी पडळ महावितरण कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सहा वर्षांपूर्वी राज्य महावितरणकडून पन्हाळा तालुक्यातील पडळ सबस्टेशनला मंजूर झालेल्या रोहित्र दुरुस्ती भवनाच्या रंगरंगोटी केलेल्या इमारतीचे तत्कालीन जिल्हा ग्रामीण एकच्या अधिकाऱ्यांनी उद्घाटनाची फीत कापण्यापलीकडे काहीच केले नाही. या रोहित्र दुरुस्ती भवन इमारतीत रोहित्र संच दुरुस्तीसाठी कुशल तंत्रज्ञ व योग्य साधनसामग्रीचा अभाव असल्याने ते आजही कुलूप बंद अवस्थेत आहे. ज्या उद्देशाने या रोहित्र भवनाची निर्मिती केली ते लवकरात -लवकर सुरू करावे, अशी मागणी सध्या शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.

महावितरण कंपनीने ज्या हेतूने शेतकऱ्यांचा वेळ व विजेअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी पडळ येथील रोहित्र दुरुस्ती भवनाची निर्मिती केली आहे, ते यापुढे तरी नेटाने सुरू करण्याकामी तत्काळ जिल्हा ग्रामीण एकच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून ते कार्यान्वित करावे.

विष्णू चौगले डे- सरपंच पडळ.

फोटो ओळ- पडळ येथील दुरुस्ती भवनाची इमारत.

Web Title: Where did the horses of Padal Rohitra Durusti Bhavan stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.