करवीर तहसील रमणमळ्यात जाणार कधी ?

By Admin | Updated: August 28, 2014 00:11 IST2014-08-28T00:08:54+5:302014-08-28T00:11:05+5:30

चार कोटींचे बजेट : वर्षभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे धूळखात

When will Karveer tahsil go to Ramanam? | करवीर तहसील रमणमळ्यात जाणार कधी ?

करवीर तहसील रमणमळ्यात जाणार कधी ?

प्रवीण देसाई - कोल्हापूर --सतत लोकांची वर्दळ...अस्ताव्यस्त वाहने लावल्यामुळे उडालेला पार्किंगचा बोजवारा...कार्यालयात जाताना बाहेर वाहतूक पोलीस आपली गाडी केव्हा उचलतील ही धास्ती...कार्यालयातही अपुऱ्या जागेमुळे कर्मचारी व नागरिकांची होणारी अडचण...हे चित्र करवीर तहसीलदार कार्यालय येथे नित्य पाहायला मिळते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक वर्षभरापूर्वी हे कार्यालय रमणमळा येथे नेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. ३ कोटी ९२ लाख रुपयांचे बजेट तयार करून पाठविलेला हा प्रस्ताव अद्याप शासनस्तरावर धूळखात पडला आहे.
करवीर तहसील कार्यालयाची कार्यकक्षा लक्षात घेता सध्याच्या कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त होणारी गर्दी नित्याचीच आहे. कार्यालयाच्या आवारात करवीर पोलीस ठाणे, शेजारीच असणारे न्यायालय व सीपीआर रुग्णालय यामुळे भाऊसिंगजी रोडवर नेहमीच गजबजल्याचे चित्र असते. त्यामुळे साहजिक या मार्गावर वाहतुकीचा ताण अधिक आहे. तहसील कार्यालयासह पोलीस ठाण्यामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग हा एक मोठा यक्षप्रश्न होऊन बसला आहे. त्यामुळे वादावादीचे प्रकार सर्रास घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी एक पोलीस अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हे कार्यालय रमणमळा येथे जाण्याने रहदारीचा ताण नक्कीच कमी होणार आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामाजवळ शासनाच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ कोटी ९२ लाखांच्या इमारत बांधकामाचे एस्टिमेट तयार करण्यात आले. त्यानंतर गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. वर्ष होऊनही यावर शासनाकडून अद्याप काहीच उत्तर आलेले नाही. त्यामुळे करवीर तहसीलदार कार्यालय गोंगाटातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्यायला रमणमळा येथे जाणार का नाही? अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.

Web Title: When will Karveer tahsil go to Ramanam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.