कळंबा ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:11+5:302021-05-07T04:24:11+5:30

अमर पाटील : कळंबा स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीस अद्यापही स्वमालकीची प्रशस्त प्रशासकीय इमारत नाही. त्यामुळे ...

When will Kalamba Gram Panchayat get its own building? | कळंबा ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत कधी मिळणार

कळंबा ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत कधी मिळणार

अमर पाटील : कळंबा

स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीस अद्यापही स्वमालकीची प्रशस्त प्रशासकीय इमारत नाही. त्यामुळे सरकारच्या अनेक पुरस्कारांची मानकरी असलेल्या या ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या इमारतीतूनच चालवला जात आहे.

पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार हनुमान तालमीनजीकच्या स्वमालकीच्या कार्यालयातून होत होता. वाढत्या नागरीकरणामुळे जुनी इमारत अपुरी पडू लागली. ती इमारत जीर्ण झाल्याने १९८५ ला स्वमालकीची इमारत उभारण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासनाने प्राधिकरणाच्या रिकाम्या पडलेल्या कार्यालयात बस्तान बसवले.

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळाने कळंबा फिल्टर हाऊसच्या उभारणीसाठी शासन मालकीच्या ७५ गुंठे जागेत कार्यालयासाठी इमारत उभी केली. फिल्टर हाऊस पूर्णत्वास जाताच ही इमारत वापराविना पडून राहिली. १९८५ ला ग्रामपंचायतीने सदर इमारत प्रशासकीय वापरासाठी घेतली. आजमितीला येथे नगर भूमापन, तालुका कृषी महसूल कार्यालयांची दाटीवाटी झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला ही जागाही अपुरी पडू लागली आहे.

चौकट : प्रस्ताव रखडला

शासकीय मालकीच्या जागेत ग्रामपंचायतीची प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल विभागास प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, तलाठी कार्यालयासाठी एकूण क्षेत्राच्या चाळीस टक्के जागा सोडा, असा आग्रह महसूलने धरला आहे. या वादातच ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव रखडला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने जुनी पोस्ट ऑफिसची इमारत निर्गतीकरण करून नव्याने बांधण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. ज्याच्या मंजुरीचे काम प्रशासकीय पातळीवर रखडले आहे.

कोट : ग्रामपंचायतीची स्वतंत्र प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी प्रशासकीय स्तरावर बराच पाठपुरावा करत असून महसूल विभागाच्या धोरणामुळे प्रत्येक वेळी काम रखडत आहे. इमारतीसाठी ग्रामपंचायत स्तरावर निधी उभा करून काम पूर्णत्वास जावे यासाठी प्रयत्नशील असून महसूल विभागाने समन्वयातून मार्ग काढून दिल्यास सर्वच प्रशासनाची गैरसोय टळणार आहे.

सागर भोगम, सरपंच, कळंबा

Web Title: When will Kalamba Gram Panchayat get its own building?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.