अपंग बांधवांना अच्छे दिन कधी ?
By Admin | Updated: December 2, 2014 23:50 IST2014-12-02T23:49:23+5:302014-12-02T23:50:03+5:30
वर्षभर अर्थसहाय्य नाही : बेरोजगार अपंगांच्या पुनर्वसनाला खो, २२ हजार अपंगांची फरफट::अपंगदिनविशेष

अपंग बांधवांना अच्छे दिन कधी ?
संदीप खवळे : कोल्हापूर :अन्य योजनांप्रमाणेच अपंगांच्या योजनांनाही निधीच्या तुटवड्याचा फटका बसला आहे़ अपंगांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून सुरू असलेल्या बीज भांडवल योजनेचे प्रस्ताव बँकेने मंजूर करून नऊ महिने होत आले तरी, अनुदान स्वरूपातील निधी नसल्यामुळे अद्यापही त्यांना या सहाय्याचा लाभ घेता आलेला नाही. जिल्ह्यात सुमारे ३० हजार अपंग आहेत़ अपंगांची थकीत कर्जे, रोजगार भत्ता, अंत्योदय धान्य, घरकुल, वित्तीय विकास महामंडळाकडील थकीत प्रकरणे यासाठी अपंग बांधवांचा लढा सुरू आहे़ पण अद्यापही शासनाकडून त्याकडे दुर्लक्षच होत आहे.
अपंग वित्तीय विकास महामंडळ, मुंबई ही अपंगांना व्यवसायासाठी वित्तसहाय्य करते़ या संस्थेकडे गेली सहा वर्षे सुमारे तीस हजार प्रकरणे प्रलंबित आहेत़ संबंधित अधिकारी आणि मंत्री तसेच आमदारांना सातत्याने निवेदन देऊनही अपंगांच्या समस्या सुटलेल्या नाहीत़ जिल्ह्यात २२ हजार बेरोजगार आहेत़ अपंगाच्या रोजगाराचा प्रश्न मोठा असून, शासनही याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे़ अपंगांच्या आर्थिक पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे़ पण पुनर्वसनासाठी शासनाकडून कोणतीही ठोस उपायोजना या चार वर्षात झाली नसल्याची प्रतिक्रिया अपंग रोजगार व पुनर्वसन संस्था, कोल्हापूरचे सदस्य सचिव संजय पोवार यांनी दिली आहे़
जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो अपंग युवक कोल्हापुरातील विविध दुकानांमध्ये काम करण्यासाठी येत असतात. अपंगत्वामुळे प्रवासादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच कामाच्या ठिकाणीही सन्माची वागणूक मिळत नाही. त्यामुळे अपंगांच्या विविध योजनांना त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अपंगांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.
जबाबदारीचे गांभीर्य शासनाला नाही
अपंगांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या बीजभांडवल योजनेतील सन २०१३-१४ चे सुमारे ४० प्रस्ताव बँकेने मंजुरी देऊनही धूळ खात पडले आहेत.
अपंगांच्या पुनर्वसनात त्यांना विविध व्यवसायासाठी देण्यात येणारे वित्तीय साहाय्य हा महत्त्वाचा भाग आहे.
अपंगांना गुणवत्ता असूनही नोकरी देताना दुय्यम प्राधान्य दिले जाते. त्यांना शारीरिक कष्टाची कामे जमत नाहीत. त्यामुळे छोटेखानी व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्यातून विविध व्यवसाय करण्यासाठी त्यांना समाजकल्याण विभागाच्या तसेच अपंग वित्तीय सहाय्य महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते.
या दोन्ही योजनांतून मिळणारा निधीच बंद झाल्यामुळे बेरोजगार अपंगाच्या आर्थिक पुर्नवसनास खीळ बसत आहे.
जिल्ह्यात सुमारे ३० हजार अपंग
२२ हजार अपंग बेरोजगार
वित्तीय सहाय्य करणाऱ्या दोन्ही योजनांना निधी अभावी खो
मतिमंद आदित्यची जलतरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी
आवड आणि जिद्द असेल, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असे नेहमी म्हटले जाते. याची प्रचिती आदित्य कुलकर्णीला पाहिल्यानंतर येते.
जिज्ञासा संचलित राही पुनर्वसन केंद्राचा हा मतिमंद विद्यार्थी. जलतरणाबरोबरच धावणे, क्रिकेट, संगीत यामध्ये त्याला खास रूची आहे.
शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही त्याने आपला ठसा उमटविला आहे. आदित्य जलतरणमध्ये सातत्याने सराव करीत आहे. त्यामुळेच तो जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
आंतरराष्ट्रीय स्पेशल आॅलिम्पिकमध्ये त्याने ५० मी., २५ मी. जलतरणमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, मुंबई येथील स्पर्धेतही त्याने चमक दाखविली.
आदित्य चांगल्याप्रकारे तबलावादन करतो. मतिमंद असूनही सर्वच बाबतीत सरस असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.