उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र कधी?
By Admin | Updated: October 7, 2015 23:57 IST2015-10-07T23:57:35+5:302015-10-07T23:57:35+5:30
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज : जागा हस्तांतरणामुळे रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळतच

उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र कधी?
संतोष बामणे --जयसिंगपूर-कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीनंतर आता उदगावचा प्रश्न समोर येत आहे. जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाच्या जागेच्या प्रश्नावरून उदगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २२ हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवा तत्परतेने उपलब्ध होत नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून जयसिंगपूरला ग्रामीण रुणालय मंजूर झालेले असून, येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील खोत पंपासमोर महाराष्ट्र शासनाची ३३ एकर जागा असून त्यामधील चार एकर जागा उदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा ही अगदी खेड्यापाड्यांत जाऊन पोहोचली असून, उदगावसारख्या बावीस हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे गावची आरोग्य सेवा जयसिंगपूर, सांगली व मिरजवर अवलंबून आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह नोकरदार, मजूर, वीटभट्टी कामगारांना आरोग्य सेवा घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागत आहे.
सध्या उदगावात अ व ब अशी दोन आरोग्य उपकेंद्र असून, त्यातील ब हे उपकेंद्र काळम्मावाडी येथे स्थलांतरित होणार आहे. तर
दुसरे उदगाव गावठाणसाठी उपलब्ध आहे. मात्र, जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मिटल्याशिवाय उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र होणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.