लाच घेताना सहायक फौजदार जाळ्यात
By Admin | Updated: March 8, 2015 00:48 IST2015-03-08T00:41:48+5:302015-03-08T00:48:05+5:30
बांबवडे पोलीस चौकीतील प्रकार : ३५०० रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लाच घेताना सहायक फौजदार जाळ्यात
मलकापूर : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील पोलीस दूरक्षेत्राचा सहायक फौजदार चंद्रकांत जानू कदम (वय ५६, रा. प्लॉट नं. १५, बापूरामनगर, कळंबा, कोल्हापूर) यास तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी ३५०० रुपयांची लाच स्वीकारताना बांबवडे पोलीस चौकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले.
मिळालेली माहिती अशी की, सहायक फौजदार चंद्रकांत कदम याने तक्रारदार आनंदा दिनकर लाड (रा. चरण, ता. शाहूवाडी) यास तुझ्याविषयी तक्रार आली आहे. तक्रारीनुसार तुझ्यावर फसवणुकीची केस टाकून तुला आत टाकतो, असे सांगून तक्रारीविरुद्ध कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने ७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे कदम याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार बांबवडे दूरक्षेत्र (पोलीस चौकीत) पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान व अप्पर अधीक्षक दिलीप कदम (ब्युरो पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उदय आफळे,
पो. हे. कॉ. मनोहर खणगावकर, पो. नि. मनोज खोत, मोहन सौंदत्ती, पो. कॉ. संदीप पावलेकर, आदी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बांबवडे पोलीस चौकीतच सहायक फौजदार कदम याला ३५०० रुपयांची लाच घेताना पकडले.
कदम व त्याच्या जोडीदाराविरुद्ध लोकांची आर्थिक पिळवणूक करणे, हप्ते मागणे, आदी तक्रारी बांबवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या होत्या. वर्षभरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यातील लाचलुचपत खात्याच्या कारवाईत सापडलेला सहायक फौजदार कदम हा तिसरा कर्मचारी ठरला. (प्रतिनिधी)