लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:22 IST2017-08-18T00:22:38+5:302017-08-18T00:22:38+5:30

लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : आरळगुंडी (ता. भुदरगड) येथील सजाची तलाठी अनुराधा मदन हावळ (वय २८) (मूळ रा. उजळाईवाडी, जि. कोल्हापूर, सध्या गारगोटी) हिला लाचलुचपत विभागाने सहा हजार रुपये लाच स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडले.
याबाबत माहिती अशी, मौजे आरळगुंडी येथील तक्रारदार यांच्या वडिलांनी सन २००१ साली सव्वा तीन गुंठे जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीचे सात-बारा पत्रकी नाव लावण्यासाठी तलाठी हावळ हिने सात हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी गुरुवारी (दि. १७) याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे गुरुवारी दोन शासकीय पंचासमक्ष पडताळणी केली असता तलाठी हावळ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती सहा हजार रुपयांवर तडजोड केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. हावळ हिने तक्रारदार यांना गारगोटी येथील त्यांच्या भाड्याच्या राहत्या घरी बोलावून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी तिला ाकडले.
ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व कोल्हापूर विभागाचे उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, पोलीस शरद पोरे, दयानंद कडुकर, छाया पाटोळे यांनी पार पाडली.
नोकरीच्या अवघ्या वर्षात धाडस
२८ आॅगस्ट २०१६ रोजी तलाठी हावळ हिला नोकरी लागली. नोकरीची सुरुवात आरळगुंडी येथून झाली होती आणि आरळगुंडी येथेच लाच घेताना सापडली. नोकरी लागून अवघे एक वर्ष पूर्ण होण्यासाठी दहा दिवस कमी होते. वर्ष पूर्ण झाले नसताना लाच स्वीकारण्यासाठी एवढं धाडस आले कोठून ? याची चर्चा तालुक्यात सुरू होती.