लाच घेताना एकाच दिवशी दोघे जाळ्यात
By Admin | Updated: July 5, 2014 01:03 IST2014-07-05T00:55:40+5:302014-07-05T01:03:19+5:30
निबंधक, हवालदार अडकला : गडहिंग्लजमध्ये कारवाई

लाच घेताना एकाच दिवशी दोघे जाळ्यात
गडहिंग्लज : घर खरेदीचा दस्त नोंदविण्यासाठी २१ हजारांची लाच घेताना येथील मुद्रांक व नोंदणी खात्याचे श्रेणी-१ दुय्यम निबंधक राजेंद्र नारायण भानसे (वय ४२, रा. धनगर गल्ली पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) आणि जमिनीच्या वादात तक्रारदाराच्या बाजूने न्यायालयात रिपोर्ट पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना येथील पोलीस ठाण्याचे हवालदार सदानंद विठ्ठल पाटील (वय ३७, कामेवाडी, ता. चंदगड) हे दोघेही आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले.
गडहिंग्लज येथील सतीश धोंडीबा हळदकर याने मावशीचे घर खरेदी घेतले आहे. त्याची दस्त नोंदणी करून देण्यासाठी भानसे याने २५ हजारांची मागणी करून २१ हजारांवर तडजोड केली होती. त्याबाबत हळदकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली होती.
दुपारी अडीचच्या सुमारास दस्त नोंदणीचे काम पूर्ण झाल्यानंतर भानसे याने हळदकर यांच्याकडून २१ हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह पाटील, हवालदार उल्हास हिरवे, पोलीस नाईक जितेंद्र शिंदे यांच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
दरम्यान, दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तक्रारदाराच्या बाजूने न्यायालयात रिपोर्ट पाठविण्यासाठी लाच स्वीकारताना हवालदार पाटील याला ‘लाचलुचपत’चे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, हवालदार मनोहर खणगावकर, मोहन सौंंदती, मनोज खोत, संजय गुरव यांनी पोलीस ठाण्यातच रंगेहात पकडले.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, भडगाव-बेरडवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सुशीला सत्याप्पा घोलराखे यांना आठ गुंठे जमीन माहेरकडून मिळाली आहे. या जमिनीत त्यांनी घर बांधले आहे; परंतु सुशीला यांचा मृत भाऊ पापू यांची मुले आणि त्यांचे चुलते व चुलत भाऊ असे दहाजण त्यांच्या कुटुंबीयांशी भांडण करत असल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तथापि, पोलिसांनी कोर्टात दावा दाखल करण्याची समज दिल्याने सुशीला यांनी येथील न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाकडून आलेल्या या दाव्याचा तपास सदानंद पाटील याच्याकडे होता. तुमच्या बाजूने कोर्टात रिपोर्ट पाठवतो असे म्हणून हवालदार पाटील याने ३ हजारांची लाच मागितली होती. (प्रतिनिधी)