दहा हजारांची लाच घेताना ‘करवीर’च्या पोलिसाला अटक

By Admin | Updated: June 11, 2014 01:15 IST2014-06-11T01:12:30+5:302014-06-11T01:15:33+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

When taking a bribe of 10,000 rupees, Karveer's police arrested him | दहा हजारांची लाच घेताना ‘करवीर’च्या पोलिसाला अटक

दहा हजारांची लाच घेताना ‘करवीर’च्या पोलिसाला अटक

कोल्हापूर : गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात लवकर पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना आज, मंगळवारी करवीर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक सुरेश रामचंद्र लोहार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. रात्री साडेनऊ वाजता दसरा चौक मैदानात त्यांनी ही कारवाई केली. हा प्रकार समजताच पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. बाजीराव तुकाराम पाटील (रा. आमशी, ता. करवीर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी : बाजीराव पाटील यांचा पुतण्या सुनील राजाराम पाटील याला बलात्कारप्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या बिंदू चौकातील कारागृहात आहे. त्याच्यावरील गुन्ह्याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात केव्हा पाठविणार, अशी विचारणा तक्रारदार पाटील यांनी पोलीसनाईक लोहारकडे केली. त्यावर मला २० हजार रुपये द्या, दोषारोपपत्र लवकर पाठवितो असे त्याने सांगितले. त्यावर पाटील आणि लोहार यांच्यात चर्चा होऊन १० हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यावेळी लोहारने आज रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. त्याबाबतची तक्रार पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. रात्री साडेनऊ वाजता दसरा चौक मैदानात पाटील यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच घेताना लोहार याला पोलिसांनी रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सापडत असल्याचे लक्षात येताच लोहारने लाच म्हणून घेतलेले पैसे या मैदानातच फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीसनाईक जितेंद्र शिंदे, मनोज खोत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पावलेकर, दयानंद कडूकर, उल्हास हिरवे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: When taking a bribe of 10,000 rupees, Karveer's police arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.