शववाहिका कमी पडल्यावर कोल्हापूरकर लगेच धावले;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:45+5:302021-04-28T04:24:45+5:30
विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर शववाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने कुटुंबीयांची अस्वस्थता ...

शववाहिका कमी पडल्यावर कोल्हापूरकर लगेच धावले;
विश्वास पाटील -
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर शववाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने कुटुंबीयांची अस्वस्थता वाढते, अशी बातमी प्रसिध्द होताच गतवर्षी महापालिकेच्या मदतीसाठी कोल्हापूरकर धावून आले आणि त्यातून १० शववाहिकांची व्यवस्था झाली. अशी बांधिलकी अन्य शहरांत लोकांकडून जोपासली जात नसल्याचे चित्र मंगळवारी पुढे आले. त्याला अंबाजोगाई (जि. बीड) येथील घटनेची पार्श्वभूमी आहे. तिथे शववाहिका न मिळाल्याने २२ कोरोना रुग्णांचे मृतदेह ट्राॅलीमध्ये उसाच्या मोळ्या भरून न्याव्यात तसे एकाच रुग्णवाहिकेतून भरून अंत्यसंस्कारासाठी नेल्याची संतापजनक व मानवतेची विटंबना करणारी घटना घडली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना अंत्यसंस्कारास नेण्यासाठी मुळात शववाहिकाच नाही. रुग्णवाहिकाच शववाहिकेचे काम करते, हे तर भयंकरच आहे. या रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी १७ मार्चला रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु त्या अद्याप मिळाल्या नाहीत. गतवर्षी कोरोनाचा कहर वाढल्यावर कोल्हापुरातही अशीच स्थिती होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे फक्त ३ शववाहिका होत्या. त्यादेखील जुन्या असल्याने नादुरुस्त होत्या. कोरोना बळी वाढल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना नातेवाईकांना जीवघेणी प्रतीक्षा करावी लागत असे. हे समजल्यावर तातडीने येथील अयोध्या डेव्हलपर्सचे मालक व्ही. बी. पाटील व घाटगे ग्रुपचे मालक तेज घाटगे धावून आले. व्ही. बी. पाटील यांच्याकडे कॅशव्हॅन होती. ती त्यांनी महापालिकेच्या नावावरच करून दिली. घाटगे यांनी नवीनच गाडी घेऊन दिली. त्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये दोघांनी खर्च केले. महापालिका यंत्रणेचा मोठा ताण त्यामुळे कमी झाला. सगळे सरकारनेच करावे, आम्ही फक्त तक्रारी करणार, ही वृत्ती कोल्हापुरात नाही. सामान्य नागरिकापासून उद्योजक, व्यापारी सर्व स्तरातील लोक संकटात धावून येत असल्याचा अनुभव कायमच येतो.
याशिवाय काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनी स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी २ शववाहिका युध्दपातळीवर यंत्रणा लावून तयार करून दिल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन व हसन मुश्रीफ फाऊंडेशनने एक शववाहिका ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून दिली. अशी मदत अंबाजोगाईमध्ये किंवा अन्य कोणत्याही शहरात झाली, तर मृतदेहांची विटंबना टाळता येऊ शकते.
कोल्हापुरात एकाचवेळी जास्तीत जास्त ३ मृतदेहच शववाहिकेतून नेले जातात. चालकाने एकदा पीपीई कीट घातला की त्याचा जीव कासावीस होतो. त्यामुळे एकाच भागातील दोन-तीन मृतदेह असतील, तर आम्ही ते नेत आहे. मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी सर्वजणच काळजी घेतात.
- रणजित चिले
मुख्य अग्निशमन अधिकारी
कोल्हापूर महापालिका
फोटो : २७०४२०२१-कोल-शववाहिका
कोल्हापुरात गतवर्षी शववाहिकांची टंचाई असल्याचे लक्षात आल्यावर अयोध्या डेव्हलपर्सचे मालक व्ही. बी. पाटील यांनी कॅशव्हॅन शववाहिका म्हणून उपलब्ध करून दिली. त्यातून महापालिकेचा ताण कमी झाला.