गुरुजीच उशीर करतात तेव्हा...!
By Admin | Updated: December 19, 2014 00:14 IST2014-12-18T23:42:01+5:302014-12-19T00:14:44+5:30
मुख्यालयी राहण्याची सक्ती : फेरतपासणी अहवालाकडे दुर्लक्ष; स्मरणपत्रालाही केराची टोपली

गुरुजीच उशीर करतात तेव्हा...!
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयात राहत असलेल्यांची वस्तुस्थितीजन्य माहिती विहीत नमुन्यात पंधरा दिवसांत द्या, असा शिक्षण विभागाने आदेश दिला. मात्र, आता महिना उलटला तरी जिल्ह्यातील सर्व ‘गुरुजीं’नी माहिती दिलेली नाही. स्मरणपत्रालाही केराची टोपली दाखवली आहे. ‘रोज शाळेला वेळेत या’ असे विद्यार्थ्यांना उपदेशाचे धडे देणारे गुरुजीच मुख्यालयासंबंधित माहिती देण्याची वेळ पाळत नाहीत, विलंब करतात. यावर पुढे काय करायचे यासंबंधी जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे.
मुख्यालयी राहावे म्हणूनच शासन शिक्षकांना दोन, तर मुख्याध्यापकांना अडीच हजार रुपये घरभाडे दरमहा देत असते. बहुतांशी गुरुजी (शिक्षक)मुख्यालयात न राहताच भाडे घेतात. त्याचा अप्रत्यक्षपणे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व प्राथमिक शिक्षकांनी नियमानुसार मुख्यालयात राहावे, असा आदेश दोन महिन्यांपूर्वी काढला होता. कार्यवाही सुरू झाली. शिक्षण प्रशासनाने माहिती घेतली. सर्व शिक्षकांनी ‘आम्ही मुख्यालयातच राहतो,’ अशी माहिती देऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. हे उघड झाल्यामुळे खरोखरंच शिक्षक मुख्यालयात राहतात का, याचा शोध घेण्यासाठी फेरतपासणीचा आदेश २७ आॅक्टोबरला प्रशासनाने सर्व विस्तार अधिकारीतर्फे गुरुजींना दिले. मुख्यालयातील वास्तव्याच्या पुराव्यासाठी फोटो, शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षाची सही आदी माहिती विहित नमुन्यात देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. मुदतीत एकाही तालुक्यातील सर्व गुरूजींनी माहिती दिली नाही.
माहिती देण्याऐवजी गुरुजी संघटनांच्या माध्यमातून मुख्यालयात राहण्याची अटच शिथील करावी यासाठी दबाव आणत राहिले. लोकप्रतिनिधींकडे जावून विनंती करत आहेत. याउलट कितीही दबाव आला तरी मागे हटायचे नाही, असा निर्धार करून प्रशासनही पाठपुरावा करत आहे. शिक्षण प्रशासनाने १५ नोव्हेंबरला विस्तार अधिकाऱ्यातर्फे सर्व गुरुजींना स्मरणपत्र दिले. या पत्राची दखल न घेतल्याने १७ रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले. दोन्ही स्मरणपत्रांना केराची टोपली दाखवून फेरतपासणी माहिती देण्याकडे गुरुजींनी पाठ फिरविली आहे.
मुख्यालयात राहत असल्यासंबंधीचा फेरतपासणी अहवाल शिक्षकांनी दिलेला नाही. समायोजन, टीईटी परीक्षा यामध्ये शिक्षण विभाग व्यस्त होता. माहितीसाठी पाठपुरावा झाला नाही. आता पुन्हा बैठक घेऊ. मुख्यालयात राहण्याची अट शिथिल केलेली नाही. कोण असे सांगत असेल, तर ते चुकीचे आहे.
- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ), जिल्हा परिषद
मुख्यालयी राहत नाहीत हीच अडचण
फेरतपासणी माहितीच्या सत्यतेसंबंधी शिक्षण विस्तार अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. यामुळे फेरतपासणीतील माहिती खरीच देणे गरजेचे आहे. खोटी माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते. खरी माहिती द्यायची तर मुख्यालयात राहण्यास जावे लागणार आहे. बहुतांशीजण मुख्यालयातच राहत नसल्यामुळे खरी माहिती देणार कशी? हीच नेमकी अडचण वेळेत माहिती न देण्याची गुरुजींची आहे.