बोरगावची लांच्छनास्पद खैरलांजी होते तेव्हा...
By Admin | Updated: July 18, 2015 00:19 IST2015-07-18T00:11:04+5:302015-07-18T00:19:48+5:30
वामन न्यायनिर्गुणे खून प्रकरण : दलित शेतकरी ठरला सामाजिक व्यवस्थेचा बळी

बोरगावची लांच्छनास्पद खैरलांजी होते तेव्हा...
दत्ता पाटील-= तासगाव प्रचलित व्यवस्थेत चाली-रिती कालबाह्य होत असताना, पुरोगामी समजल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील दलित समाजातील वामन न्यायनिर्गुणे यांच्या खुनाची घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे. सर्व आयुष्य मुंबईत घालविल्यानंतर उतारवयात गावाकडे येऊन आदर्शवत शेती करणाऱ्या न्यायनिर्गुणेंना गुरुवारी केवळ तथाकथित रुढींनुसार वागत नसल्याच्या कारणावरून संपविण्यात आले. बोरगावची खैरलांजी करणाऱ्या आणि सामाजिक व्यवस्थेचा बळी ठरलेल्या घटनेचा हा ‘आॅन दि स्पॉट रिपोर्ट’...
आॅन दि स्पॉट रिपोर्ट
वामन न्यायनिर्गुणे यांचे वडील उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यामुळे वामन यांचे जन्मापासूनचे सर्व आयुष्य मुंबईतच गेले. गोदीत नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी गावाकडे वडिलोपार्जित शेती विकसित करून गावातच राहायचे, या हेतूने ते कुटुंबासह बोरगावात आले. गावात आल्यानंतर साडेपाच एकर शेती पूर्णपणे बागायती केली. नवनवीन प्रयोग राबवून आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यांपूर्वी शेजारील शेतकऱ्याची चार एकर जमीन करारतत्त्वावर कसण्यासाठी घेतली. त्या शेतीतही उसाची लागण सुरू केली होती. शेतात त्यांनी दहा गाई, दोन म्हैशींचा मुक्त गोठ्याचा यशस्वी प्रयोगही केला आहे.
न्यायनिर्गुणे यांनी सर्व आयुष्य मुंबईत घालवून गावाकडे आल्यानंतर दोनच वर्षात जिरायती शेतीचे नंदनवन केले. हे करत असताना त्यांचा गावगाड्याशी, गावातील चाली-रितीशी कधीच संबंध आला नाही. त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मदतीसाठी राहिलेला मेहुणा एवढाच परिवार. हा सगळाच परिवार घर ते शेत या चाकोरीच्या बाहेर गेलेला नाही. त्यामुळे गावातील पाटील कोण आणि पुढारी कोण, याच्याशी त्यांचा कसलाच संबंध आला नाही. मुंबईसारख्या जातीव्यवस्था हद्दपार झालेल्या शहरात राहिल्यामुळे त्यांचा या व्यवस्थेशी संबंधच आला नव्हता.
अनेक वर्षांपूर्वी खेड्यापाड्यात जातीव्यवस्थेचा पगडा होता. कालांतराने ही व्यवस्था मोडीत निघाली. पुरोगामी सांगली जिल्ह्याने त्याचा अंगीकारही केला. मात्र अजूनही काही गावात या अनिष्ट व्यवस्थेचा पगडा असणारे लोक आहेत, हे वास्तव वामन न्यायनिर्गुणेंच्या खुनाच्या घटनेनंतर चव्हाट्यावर आले आहे. ‘पाटलांना नमस्कार का करत नाही?’ एवढ्या कारणासाठी वामन न्यायनिर्गुणेंना जीव गमवावा लागला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारीच आहे. सवर्णवादी पगडा गाजवणाऱ्या व्यवस्थेत अजूनही काही लोक भरडले जात आहेत, याचे प्रत्यंतर आणून देणारी आहे. या घटनेने केवळ न्यायनिर्गुणेंचाच नव्हे, तर सामाजिक व्यवस्थेचाच खून झाला असून तालुक्याच्या पुरोगामीत्वाचा बुरखाच फाडला गेला आहे. हे थांबवायचे असेल तर दोषींना कठोर शिक्षा करून अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीवर वचक निर्माण व्हायला हवा, अशी चर्चा शुक्रवारी तासगाव तालुक्यात होती.
बोरगावच्या खुनाचा ‘संग्राम’कडून निषेध
सांगली : बोरगाव (ता. तासगाव) येथील वामन सुबराव न्यायनिर्गुणे या वृद्ध शेतकऱ्याच्या खुनाचा संपदा ग्रामीण महिला संस्थेने (संग्राम) निषेध केला आहे. जातीयवादातून दलित समाजातील लोकांचे बळी जाण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. याच जातीयवादी हिंसक प्रवृत्तीचे लोक सांगली जिल्ह्यापर्यंत आले असून, याला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी संस्थेच्या कार्यवाह मीना शेषू यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, वामन न्यायनिर्गुणे यांनी शेतात केलेली प्रगती न बघविल्याने गावातील दोन तरुणांनी त्यांचा खून केला. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. समाजात अजूनही सवर्ण समाजाची दलित समाजाकडे बघण्याची मानसिकता बदलली नसल्याचे या घटनेतून दिसून येते. संशयितांनी न्यायनिर्गुणे यांना ‘तुम्ही मुंबईतून येऊन गावातील लोकांपेक्षा मोठी प्रगती केली. आमच्याकडे जरा लक्ष असू द्या, आम्ही मराठा समाजाचे आहोत’, असे टोमणे मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. न्यायनिर्गुणे यांनी संशयितांना ‘तुम्हीही कष्ट करा, मोठे व्हा’, असे समजावून सांगितले होते. तरीही वाद मिटला नाही. संशयित चंद्रकांत पाटील व सचिन पाटील यांनी घटनेदिवशी न्यायनिर्गुणे यांचे मेहुणे सुनील कांबळे यांना मारहाण केली होती. न्यायनिर्गुणे यांनी याचा जाब विचारताच त्यांनाही मारहाण केली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. पण पोलिसांनी कठोर भूमिका घेतली नाही. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडाव्यात ही बाब संतापजनक व खेदजनक आहे. जिल्ह्यातील एकाही पुरोगामी संघटनेने याचा निषेध केला नाही. येथून पुढे जातीपाती व धर्मा-धर्मातून कोणाचा हकनाक बळी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
किती दिवस सहन करणार?
शुक्रवारी बोरगावात सन्नाटा होता. न्यायनिर्गुणेंच्या खुनाची दबक्या आवाजात चर्चा होती. मागासवर्गीय समाजावर अजूनही अत्याचार सुरू आहेत. गावात आम्हीच का कमीपणा घ्यायचा? समानतेचा बदल कधी घडणार? किती दिवस असे अत्याचार सहन करणार? या व्यवस्थेत बदल कधी घडणार? आमचा समाज गावात मूठभर आहे, म्हणून आमच्या लोकांनी हे सहन करायचे का? असा संताप न्यायनिर्गुणे यांचे मुंबईत वास्तव्य करणारे भाचे अमर कांबळे आणि सुशील कदम यांनी व्यक्त केला. आमच्या समाजातील लोक शिक्षित झाले, मात्र संघटित झाले नाहीत, त्याचाच गैरफायदा घेतला जात आहे. खेड्यात लोकांना अशा अत्याचाराचा अजूनही सामना करावा लागत आहे, असेही ते म्हणाले. या घटनेनंतर जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी भेट दिली. मात्र गावातील, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी साधी विचारपूसदेखील केली नसल्याची खंत शंकर न्यायनिर्गुणे यांनी व्यक्त केली.
खैरलांजी, नगरला जे घडले, ते तासगावसारख्या प्रगत तालुक्यात घडेल, अशी अपेक्षा नव्हती. केवळ नमस्कार करीत नसल्याच्या कारणातून मागासवर्गीय, पण कष्टाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलेल्या कुटुंबाला मारहाण होणारी घटना चिंंताजनक असून संताप आणणारी आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उच्चजातीतील तथाकथित नेत्यांनी गांभीर्याने घ्यायला हवे. पोलीस, न्यायव्यवस्थेकडून कठोर कारवाई होईल, याचा भरवसा वाटतो.
- डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत
वामन न्यायनिर्गुणेंचा खून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. दलितांवर सातत्याने अन्याय सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात दलितांना शस्त्रांचा परवाना तरी द्या, नाहीतर अत्याचार थांबवा, या मागणीसाठी आणि बोरगाव खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी २० जुलैला तासगावात निषेध मोर्चा काढणार आहोत. गावा-गावातील सामाजिक तेढ संपविण्यासाठी दलित-सवर्ण समितीची स्थापना करण्याचीही आवश्यकता आहे.
- संदेश भंडारे, जिल्हाध्यक्ष, युवक आरपीआय, सांगली