तमदलगेकरांना ‘वारणे’चे पाणी केव्हा?
By Admin | Updated: May 12, 2015 00:12 IST2015-05-11T23:59:11+5:302015-05-12T00:12:18+5:30
दिवसाआड पाणीपुरवठा : पेयजल योजनेच्या कामास मुहूर्त सापडेना; ‘शासकीय काम सहा महिने थांब’चा अनुभव

तमदलगेकरांना ‘वारणे’चे पाणी केव्हा?
संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यातील तमदलगे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मुहूर्त केव्हा सापडणार, असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे. निविदा निघाली मात्र काम सुरू नसल्यामुळे या योजनेला ‘शासकीय काम सहा महिने थांब’, असाच अनुभव येत आहे. सध्या पाणीटंचाई भासत नसली तरी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ही योजना पूर्ण होण्याची गरज आहे.
तालुक्यातील टंचाईग्रस्त म्हणून तमदलगे गावाची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त गाव म्हणून शासनाने जाहीर केलेले होते.
गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाझर तलाव चांगला भरत आहे. मुख्य ओढ्यालगतच ग्राम पाणीपुरवठ्याची विहीर आहे. विहिरीतूनच गावात पिण्याचे पाणी पुरविले जाते. विहिरीलगतच जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेला बंधारा आहे. तलावात पाणी असेल तरच बंधारा भरतो व तलावातील पाझर व बंधाऱ्यातील पाझर यावरच विहिरीतील पाणी अवलंबून आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. विहिरीतील पाण्यामुळे सध्या एक दिवसाआड का होईना पाणीपुरवठा केला जात आहे. बंधारा व तलावातील पाणी आटले असले तरी पाझर पाण्यामुळे विहिरीत पाणी साठत आहे. सध्या गावास दैनंदिन १ लाख २० हजार लिटर पाण्याची गरज असली तरी कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. विहिरीतील फुटव्हॉल्व उघड्यावर पडले आहेत.
दरम्यान, गावात सतत पाणीटंचाई भासत असल्यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावाच्या जिव्हाळ्याचा या पाणी योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल, अशी अपेक्षा असताना निविदा निघाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडील प्रशासकीय कामाच्या घोळामुळे काम सुरू होण्यास विलंब होत आहे. याबाबत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेले असताना कित्येक वर्षांनंतर वारणा नदीतून पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्याची गरज आहे.
एक दिवसाआड पाणी
सध्या गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा अजून तरी टॅँकरची आवश्यकता भासत नसली तरी तीन कूपनलिका खुदाईची गरज आहे.
राष्ट्रीय पेयजल योजना कामासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच पिरगोंडा पाटील यांनी दिली.
...पण वर्कआॅर्डर नाही
तमदलगे पेयजल योजनेची निविदा निघाली आहे. मात्र, वर्कआॅर्डर मिळाली नसल्यामुळे अजून कामास सुरूवात
केलेली नाही.
जिल्हा परिषदेकडील प्रशासन निवडणूक प्रक्रियेत होते. आदेशाबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार कमते यांनी दिली.