माणुसकीपुढे सोने काय कामाचे !
By Admin | Updated: November 8, 2014 00:24 IST2014-11-08T00:19:59+5:302014-11-08T00:24:00+5:30
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : ‘समीर’च्या संवेदनशील मनाला भुयेकरांची बक्षीस देऊन दाद

माणुसकीपुढे सोने काय कामाचे !
आदित्य वेल्हाळ - कोल्हापूर --सध्याच्या मतलबी जगात रस्त्यात सापडलेले दहा रुपयेही कुणी परत करण्याचे सौजन्य दाखवत नाही. अशावेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार त्यांच्या घरी जाऊन देण्याची माणुसकी केशेपाडळी (ता. कऱ्हाड) येथील समीर पालकर या रिक्षाचालकाने दाखविली. स्वार्थी जगात अजूनही माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचे समीर यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.
भुये (ता. करवीर) येथील प्रदीप ऊर्फ समाधान नामदेव पाटील व उषा प्रदीप पाटील या नवदाम्पत्याच्या दुचाकीचा कराड येथील विजयनगरच्या हद्दीत भीषण अपघात झाला होता. हा अपघात समीर पालकर यांच्या समोरच घडला होता. या अपघातात प्रदीप पाटील हे जागीच ठार झाले होते, तर उषा पाटील या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातस्थळी अनेकांनी गर्दी केली होती, पण त्यांना तातडीने दवाखान्यात पोहोचविण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. समीरसह काही नागरिकांनी तेथून जाणाऱ्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एकानेही गाडी न थांबविल्याने अखेर समीर यांनी आपल्या घरी जाऊन रिक्षा आणून
सौ. पाटील यांना तातडीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
समीर यांनी जखमी अवस्थेतील सौ. पाटील यांना दवाखान्यात नेल्याने त्यांच्या रिक्षात रक्त सांडले होते. दुसऱ्या दिवशी रिक्षा साफ करताना समीर यांच्या पत्नीला दीड तोळ्यांचा सोन्याचा हार रिक्षात सापडला. त्यांनी समीरना ही गोष्ट सांगितल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पाटील कुटुंबीयांना सोन्याचा सापडलेला हार परत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाटील यांचा पत्ता माहिती नसल्याने हार द्यायचा कुठे हा प्रश्न समीर यांना पडला. अखेर दोन दिवसांनंतर पाटील कुटुंबीयांचा पत्ता मिळाला आणि समीर आपल्या कुटुंबीयांसहीत भुये येथे आले आणि प्रदीप पाटील यांच्या आईच्या हातात त्यांनी सापडलेला सोन्याचा हार दिला. ‘माझी सूनच परत आणून दिलीस,’ असा हंबरडा प्रदीप यांच्या आईने फोडला आणि सारा गाव भावूक नजरेने समीरकडे पाहू लागला. समीरने दाखविलेल्या माणुसकीला दाद देत व त्याच्या प्रामाणिकेतला सलाम करत माजी सरपंच अभिजित पाटील व गावकऱ्यांनी त्यांचा रोख बक्षीस देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
उषा पाटील यांना वाचविण्यासाठी दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. रिक्षात सापडलेला दागिना परत करून आम्ही काही मोठे काम केले नाही. माणुसकीपुढे सोने काय कामाचे ? पाटील दाम्पत्याची शेवटची आठवण त्यांच्या कुटुंबीयांना परत करणे हेच माझे कर्तव्य होते.
- समीर पालकर (रिक्षाचालक)