शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर सत्तेचा काय फायदा?
By Admin | Updated: January 1, 2015 00:01 IST2014-12-31T23:16:57+5:302015-01-01T00:01:25+5:30
राजू शेट्टी : साखर आयुक्तांच्या दारात बसणार

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर सत्तेचा काय फायदा?
कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी कारखानदारांचा काँग्रेसच्या राजवटीत जसा व्यवहार होता तसाच तो राहणार असेल आणि राज्य सरकार नुसते बघ्याचीच भूमिका घेणार असेल, तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. आम्ही सत्तेत गेलो व सत्तेचा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार नसेल, तर अशी सत्ता काय कामाची, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी यासाठी साखर आयुक्तांच्या दारात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेट्टी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे आणि सहकार सचिव राजगोपाल देवरा यांच्याशी यंदाच्या ऊसदरप्रश्नी चर्चा झाली. आम्ही फार काळ वाट पाहू शकत नाही व सरकारनेही आमचा अंत पाहू नये, असा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.
केंद्र सरकारने मदत करावी म्हणून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना यापूर्वीच निवेदन दिले आहे. ऊसदर मंडळाच्या बैठकीतही जे कारखाने एफआरपी एकरकमी देणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा निर्णय झाला आहे. कायद्यानुसार एफआरपी द्यावीच लागेल, असेही बैठकीत स्पष्ट केले होते, असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने वगळता अन्य जिल्ह्यांतील कारखाने सोयीनुसार व जमेल तेवढे पैसे शेतकऱ्यांना देऊ लागले आहेत. काही कारखान्यांनी दीड महिन्यांत शेतकऱ्यांना दमडीही दिलेली नाही.
अशा स्थितीत सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज होती; परंतु सरकार वेळकाढू भूमिका घेणार असेल तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. सोलापुरात मोर्चा झाला. सांगलीत कालच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. आता आम्ही पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाच्या दारात जाऊन ठिय्या मारू. ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये, असे आमचे सरकारला सांगणे आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून, सहभागाविषयी विचारले असता शेट्टी म्हणाले, त्यासंदर्भातील चर्चा अजूनही मोघम स्वरूपात आहे. (प्रतिनिधी)