हृदय बंद पडले तर काय कराल
By Admin | Updated: October 16, 2015 00:12 IST2015-10-15T01:04:03+5:302015-10-16T00:12:58+5:30
भूलशास्त्र संघटनेची जनजागृती : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त मोहीम

हृदय बंद पडले तर काय कराल
कोल्हापूर : एखाद्या नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचे हृदय बंद पडले तर काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी त्या रुग्णाची काळजी कशी घायची आणि त्याचे प्राण कसे वाचवायचे हे माहीत हवे. याबद्दलची जनजागृती उद्या, शुक्रवारी ‘जागतिक भूलशास्त्र दिवसानिमित्त’ (दि. १६) भारतीय भूलशास्त्र संघटनेच्या कोल्हापूर शाखेतर्फे शहरातील विविध ठिकाणी एका पथनाट्याद्वारे सादर करून दिली जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. किरण भिंगार्डे यांनी दिली.
पथनाट्याची सुरुवात प्रथम महावीर गार्डन येथे सकाळी ७ वाजता होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेआठला शिवाजी विद्यापीठ, सीपीआर रुग्णालय येथे सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. याशिवाय भवानी मंडप येथे दुपारी ३ वाजता शेवटचे पथनाट्य सादर केले जाणार आहे. या जनजागृती मोहिमेत सादर केल्या जाणाऱ्या पथनाट्यामध्ये एखाद्याचे हृदय बंद पडले तर त्याच्या नातेवाईकांनी किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांनी काय करायचे याबद्दल यामध्ये शिकविले जाणार आहे. हृदय बंद पडले तर प्रथम श्वसननलिकेतील अडथळा दूर कसा करायचा, हे शिकविले जाणार आहे. याशिवाय दुसरी पायरी म्हणून तोंडावाटे कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यायचा आणि छातीवर दाब देऊन हृदय कसे सुरू करायचे याची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. हे पथनाट्य जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त आणि हृदय बंद पडल्यानंतर होणारे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. जास्तीत जास्त लोकांचे प्राण हे केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने होत आहेत म्हणून अशाप्रकारची जनजागृती संघटनेतर्फे हाती घेतली आहे.