शिवसेनेची ही कसली मैत्री?
By Admin | Updated: August 21, 2014 00:51 IST2014-08-21T00:49:37+5:302014-08-21T00:51:11+5:30
राजू शेट्टी यांचा सवाल : कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय, महायुतीत तणाव

शिवसेनेची ही कसली मैत्री?
विश्वास पाटील - कोल्हापूर -ज्या माजी आमदारांने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास उघड विरोध केला, त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पायघड्या घालत असेल तर शिवसेनेचे हे राजकारण न समजणारे आहे. शिवसेनेचा हा घटक पक्षांसोबत कसला व्यवहार आणि ही कसली मैत्री, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उद्याच्या कोल्हापूर जिल्ह्यांतील कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे खासदार शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घडामोडींमुळे महायुतीमध्ये जागावाटपाआधीच तणाव निर्माण झाला आहे.
शाहूवाडी मतदारसंघातील पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या पुढाकाराने सरुड (ता.शाहूवाडी) येथे होत असलेल्या मेळाव्यासाठी ठाकरे उद्या (गुरुवारी) कोल्हापुरातयेत आहेत. सरुडकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते खासदार शेट्टी यांच्याविरोधात काम केले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पाठिंबा दिला होता. त्यावरून शेट्टी व शिवसेना यांच्यात धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेने सत्यजित पाटील यांना उमेदवारी देवू नये, अशी उघड भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. शाहूवाडी मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेस द्यावा व त्यापक्षातर्फे विद्यमान आमदार विनय कोरे यांच्याविरोधात संघटनेचे लढाऊ नेते सदाभाऊ खोत किंवा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांना
रिंगणात उतरण्याची ‘स्वाभिमानी’ची तयारी आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी म्हणाले,‘माझ्या मतदारसंघात शिवसेना कार्यक्रम घेत असेल व आम्हांला त्याबद्दल अजिबातच विश्वासात घेतले जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही. त्याबद्दल मी आज संपर्कनेते दिवाकर रावते यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार आहे. शिवसेनेने कुणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा अधिकार आहे. परंतु ज्यांनी आम्हांला लोकसभेला थेट विरोध केला, त्यांनाच तुम्ही उमेदवारी देणार असाल तर संघटनेचे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत. यांनी काँग्रेस सत्तेत असताना लुटमार केली तेच लोक आता काँग्रेसचे जहाज बुडायला लागल्यावर महायुतीत यायला रांग लागली आहे. अशा लोकांना घेतल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. याचा शिवसेना नेतृत्वाने विचार करावा, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे.