‘पी.एन.’नी काय उजेड पाडला
By Admin | Updated: January 17, 2017 00:30 IST2017-01-17T00:30:15+5:302017-01-17T00:30:15+5:30
धैर्यशील पाटील, पवार यांचा पलटवार : पारदर्शकतेमुळेच ‘भोगावती’ कर्जमुक्तीकडे

‘पी.एन.’नी काय उजेड पाडला
कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत पारदर्शक कारभार केल्यामुळेच भोगावती साखर कारखाना कर्जमुक्तीकडे चालला आहे; पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी वीस वर्षे सत्ता असताना पी.एन. पाटील यांनी काय उजेड पाडला, सूज्ञ सभासदांना माहिती आहे, असा पलटवार परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर व माजी उपाध्यक्ष अशोक पवार-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत कॉँग्रेसवर केला.
‘राष्ट्रवादी काँग्रेसमुळे कारखाना मोडला’ अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांनी रविवारी परिते येथील मेळाव्यात केली होती. त्यावर राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल व आमदार चंद्रदीप नरके गटाच्यावतीने पत्रकार परिषदेत कॉँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. धैर्यशील पाटील म्हणाले, ‘भोगावती’ची सलग वीस वर्षे सत्ता कॉँग्रेसकडे होती. त्या काळात कारखाना ३५ कोटींच्या संचित तोट्यात, २८ कोटींचे कर्ज, २२ कोटींची देणी अशा आर्थिक अरिष्टात सापडला होता. सूज्ञ सभासदांनी परिवर्तन करून राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात कारखाना दिला. त्यानंतर संचित तोटा २९ कोटींनी कमी केला. कर्मचाऱ्यांचा सात महिन्यांचा पगार देऊन नियमित पगार देण्याचा प्रयत्न केला. सध्या कारखान्यावर १९ कोटींचे सॉफ्ट लोन तर तेवढेच गॅप लोन आहे. राज्यात पहिल्या पाचमध्ये आम्ही ऊस दर दिला आहे; पण विरोधक ४२५ कोटींचे कर्ज असल्याचा कांगावा करत सुटले आहेत. ‘टीआरएफ’ खरेदीत पुणे येथे झालेल्या ठेकेदाराच्या खुनाची चौकशी ‘सीआयडी’मार्फत करावी म्हणजे सर्व स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
नोकरभरती गरजेनुसारच केली आहे. त्यामुळे कारखान्यावर कोणताही अतिरिक्त भार पडलेला नाही. आमचा कारभार सभासदांनी बघितला आहे, सूज्ञ सभासद तुलना करून चांगलाच निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीत ‘दादासाहेब पाटील-कौलवकर विकास आघाडी’ एकसंध आहे. भाजपसह आणखी काहीजण आमच्या संपर्कात असल्याचेही धैर्यशील पाटील यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे माजी संचालक उपस्थित होते.
एका व्यासपीठावर येऊन आरोप करा
पाच वर्षांत आम्ही पारदर्शक कारभार केला म्हणूनच कारखाना वाचला, अन्यथा ‘दौलत’सारखी अवस्था झाली असती.
विरोधाला विरोध करा पण चांगल्याला चांगले म्हणण्याची सवयही असावी.
आरोपच करायचा असेल, तर एका व्यासपीठावर येऊन करावेत, आम्हीही वीस वर्षांचा पाढा वाचतो, असा इशारा अविनाश पाटील-राशिवडेकर यांनी दिला.