अल्पसंख्याकांबद्दल अनास्था का?

By Admin | Updated: December 19, 2014 00:13 IST2014-12-18T23:46:00+5:302014-12-19T00:13:57+5:30

अल्पसंख्याक हक्क दिनी सवाल : गेल्या सहा वर्षांपासून समितीच नेमली नाही

What about non-minority? | अल्पसंख्याकांबद्दल अनास्था का?

अल्पसंख्याकांबद्दल अनास्था का?

कोल्हापूर : अल्पसंख्याकांना घटनेनेच हक्क दिले असताना या हक्कांची अंमलबजावणी करताना शासकीय अधिकारी अल्पसंख्याकाबद्दल एवढी अनास्था का बाळगतात, असा रोखठोक सवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या अल्पसंख्याक हक्क दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित झाला. अल्पसंख्याकांसाठी अनेक योजना आहेत; परंतु त्या शासकीय अनास्थेमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत, अशा तक्रारीही करण्यात आल्या. अल्पसंख्याकासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज, गुरुवारी सायंकाळी अल्पसंख्याक हक्क दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य रावसाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समोरच शासकीय अनास्थेचा पाढा वाचण्यात आला.
तौफिक मुल्लाणी यांनीच या विषयाला हात घातला. गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा पातळीवर अल्पसंख्याक सनियंत्रण समिती नेमली गेली नसल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलात की अल्पसंख्याकाबद्दल अधिकारी अनास्था का बाळगतात हेच कळत नाही. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर त्या योजना तालुकास्तरापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे; परंतु दुर्दैवाने तसा प्रयत्न होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यता मुल्लाणी यांनी बोलून दाखविली.
अल्पसंख्याकांच्या शाळेत चक्क अल्पसंख्याक समाजातील मुलांनाच प्रवेश मिळत नाही याकडे एका व्यक्तीने लक्ष वेधले. ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. सागर चौगले यांनी अल्पसंख्याक समाजाला दाखले मिळत नसल्याची तक्रार केली. यावेळी महानगरपालिका उपायुक्त विजय खोराटे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जी. जगदाळे, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रतिभा सुर्वे, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका श्रीमती कुलकर्णी यांनी अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.
अल्पसंख्याकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. ज्या काही तक्रारी आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही राज्य आयोगाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास दस्तगीर मुल्ला, पोलीस निरीक्षक रमेश सरोदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: What about non-minority?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.