भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष
By Admin | Updated: October 29, 2015 00:48 IST2015-10-29T00:33:28+5:302015-10-29T00:48:11+5:30
हसन मुश्रीफ : फुलेवाडी येथे प्रचारसभा

भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष
कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरचा टोल एक महिन्यात बंद करतो, असे सांगणारे आणि सत्तेवर येऊन एक वर्ष झालेल्या भाजप सरकारने अद्याप टोल का हटविला नाही, असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथे जाहीर सभा घेण्यात आली. मुश्रीफ म्हणाले, पैशाच्या जोरांवर आतापर्यंत महापालिकेत ताराराणी आघाडीने सत्ता आणली आणि गेल्या वीस वर्षांत महापालिकेचे वाटोळे केले. अशा आघाडीशी भाजपने युती केली आहे. या शहरात महायुतीची सत्ता आल्यास आणखी पंधरा वर्षे शहराचा विकास मागे जाईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष करण्यास सुरू केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला जनतेचे पाठबळ मिळत आहे म्हणूनच पक्षाला बदनाम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जात आहे; पण सुजाण जनता आमच्या पाठीशी राहील.
यावेळी प्रा. जयंत पाटील म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक योजना आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणल्या. राष्ट्रवादीकडे विकासात्मक दृष्टिकोन असल्याने जनता आमच्याकडे सत्ता सोपवेल. यावेळी अजय कोराणे, राजेंद्र सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.