प्रवाशांचे फुले देऊन स्वागत
By Admin | Updated: December 22, 2015 01:00 IST2015-12-22T00:24:24+5:302015-12-22T01:00:22+5:30
सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताह : एसटी स्थानकामध्ये अडचणींबाबत चर्चा

प्रवाशांचे फुले देऊन स्वागत
कोल्हापूर : ‘आपले बसस्थानक परिसरात स्वागत आहे’. ‘अमुक गाडी थोड्याच वेळात येत आहे आपण प्रतीक्षा करा’, अशा आवाजात प्रवाशांना महामंडळाचे कर्मचारी आपुलकीने विचारत होते तसेच आगारातील स्पीकरवरूनही असा आपुलकीचा आवाज बसस्थानकांत घुमत असल्याने प्रवासीवर्गाला सुखद धक्का बसत आहे. निमित्त आहे सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताहाचे. हा सप्ताह सोमवारपासून सुरू झाला असून २७ रविवारपर्यंत तो साजरा केला जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयी-सुविधांकरिता अनेक योजना राबविल्या जातात. त्याच अंतर्गत सोमवारपासून दि. २७ रविवारपर्यंत ‘सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाची सोमवारी सुरुवात झाली. स्थानकप्रमुख अभय कदम यांनी सर्व कर्मचारी, चालक व वाहकांना सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताहांची माहिती दिली. तसेच आवारात प्रवाशांची वैयक्तिक भेट घेऊन प्रवाशांना एस. टी. महामंडळाच्या बसेसमधील अडचणींबाबत विचारणा करण्यात आली. तसेच प्रवास कसा सोपस्कार आहे याबाबत चर्चा
केली. यासह एस. टी. बसेस प्रवाशांनीच स्वच्छ ठेवण्याची विनंतीही केली.
सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने दिवसभर मध्यवर्ती बसस्थानक आवारात स्पीकरवरून ‘सुस्वागतम, सुस्वागतम आपले कोल्हापूर बसस्थानकातर्फे स्वागत’ असा आवाज प्रवासी बंधू-भगिनींच्या कानावर पडत होता. प्रवासीवर्गास गावाच्या गाडीची माहिती कंट्रोल केबिनमधून देण्यात येते. आगारामध्ये लागलेल्या गाड्या ज्या गावांना जाणार आहेत, त्याबाबत स्पीकरच्या माध्यमाने जाहीर करत प्रवाशांपर्यंत माहिती पुरविली जात होती. बसचालक, वाहक प्रवाशांशी आपुलकीने सुसंवाद साधत
होते. प्रवाशांनी काही प्रश्न विचारताच वाहक , कंट्रोल रूममधील वैतागलेले कर्मचारी आज मात्र प्रत्येक प्रवाशांशी आपुलकीने बोलत असल्याचे पाहून प्रवाशांनाही दिवसभर सुखद धक्का बसत होता. महामंडळाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले, पण हा उपक्रम फक्त सप्ताहापर्यंतच
मर्यादित न राहता कायमस्वरूपी राबवावा, अशी मागणीही प्रवाशांनी केली.
विशेष नोंदी घेणार
सौजन्य सप्ताहादरम्यान महामंडळाच्यावतीने प्रवाशांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रवाशांनी आपल्या सूचना व तक्रारी नोंदवायच्या आहेत. या मोहिमेअंती प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे सौजन्यपूर्ण वर्तणूक करणारे चालक व वाहक, वाहतूक नियंत्रकांची माहिती एकत्र करून त्यांना अभिनंदन पत्र देण्यात येईल. तसेच प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तणूक न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.