सांगली : घातक शस्त्रसाठा बाळगून त्याची कुपवाडमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुंडाविरोधी पथकाने सोमवारी दुपारी अटक केली. संजय अर्जुन कोळेकर (वय ४०, रा. शेंडगे मळा, तिकोंडी, ता. जत) व नागेश शरणाप्पा जालवादी (१९, मदनाळ, ता. इंडी, सध्या दत्तनगर, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीची चार पिस्टल, सात जिवंत काडतुसे या शस्त्रसाठ्यासह एक दुचाकी असा एकूण अडीच लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. कोळेकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, दरोडा व वाटमारीचे आठ गुन्हे दाखल आहेत. खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात त्याने पाच वर्षे शिक्षा भोगली होती. त्यानंतर तो पंधरा दिवसांच्या संचित रजेवर कारागृहातून बाहेर आला होता. रजेची मुदत संपल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर न होता, तो तब्बल आठ वर्षे फरारी राहिला. या काळात त्याने १४ जणांची टोळी तयार करून जत-कर्नाटक सीमेवर त्याने लूटमार व दरोड्याचे गुन्हे केले. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी २०१२ मध्ये या टोळीस महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण(मोक्का) कायद्याखाली कारवाई केली होती. टोळीतील सर्व गुन्हेगार जेरबंद झाले होते. मात्र कोळेकर सापडला नव्हता.कोळेकर व त्याचा साथीदार नागेश जालवादी हे दोघे कुपवाड व बामणोली (ता. मिरज) येथील गणेशनगरमधील बाळूमामा मंदिराजवळ देशी बनावटीची पिस्टल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र शहाणे, हवालदार श्रीपती देशपांडे, शंकर पाटील, सुनील भिसे, महेश आवळे, सागर लवटे, वैभव पाटील, संजय कांबळे, शंकर पाटील, प्रफुल्ल सुर्वे, संतोष पुजारी, दिलीप हिंगाणे, विशेष पथकातील निलेश कदम, राजेंद्र जंगम यांच्या पथकाने कुपवाड व बामणोलीत सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही दुपारी आले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर चार देशी बनावटीची पिस्टल व सात जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना मंगळवारी (दि. २१) न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी)पोलीसप्रमुखांकडून चौकशीजिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी कोळेकर व जालवादी यांची कसून चौकशी केली. चौकशीत त्यांनी हा शस्त्रसाठा कर्नाटकातील एका गुन्हेगाराकडून खरेदी केल्याची कबुली दिली. दरम्यान, जालवादी हा कुपवाड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध यापूर्वी एक गुन्हा नोंद आहे. तो कुपवाडमध्ये नातेवाईकांकडे राहतो. तो हमाली काम करतो. कोळेकरला फरारी काळात त्याने आश्रय दिल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
कुपवाडमध्ये शस्त्रसाठा जप्त
By admin | Updated: April 23, 2015 00:58 IST