सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारतीसाठी निधी देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST2021-07-03T04:15:53+5:302021-07-03T04:15:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : सांगरुळ परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्या व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण लक्षात घेता, नवीन इमारतीसाठी निधी ...

सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारतीसाठी निधी देऊ
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : सांगरुळ परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्या व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण लक्षात घेता, नवीन इमारतीसाठी निधी देऊ, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत मंजूर करावी, आरोग्य विभागातील अपुरी कर्मचारी संख्या, लसीचा तुटवडा आदीबाबत आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांची भेट घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील आठ-दहा गावांसह बारा वाड्यांचा ताण आहे. इमारत लहान असल्याने येथे रुग्णांची हेळसांड होते. लसीचा तुटवडा असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असल्याचे सरपंच सदाशिव खाडे यांनी सांगितले. यावर, लसीच्या तुटवड्याबाबत दोन दिवसांपूर्वी आढावा घेतला आहे. येत्या दोन दिवसांत लसीचा पुरवठा सुरळीत होईल. कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असल्याने लवकरच हाही प्रश्न निकालात निघणार असून, आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधीही दिला जाईल, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. उपसरपंच सुशांत नाळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाळे, आनंदा इंगळे, सर्जेराव मगदूम, सागर नाळे उपस्थित होते.
फोटो ओळी : सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी निधी द्या, यासह विविध मागण्यांचे निवेदन शुक्रवारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले. यावेळी आनंदा इंगळे, सर्जेराव मगदूम, सुशांत नाळे, सचिन नाळे, सरपंच सदाशिव खाडे, आमदार प्रा. जयंत आसगावकर उपस्थित होते. (फाेटो - ०२०७२०२१-कोल-सांगरुळ)