मुश्रीफांशी वाकडे घेणार नाही

By Admin | Updated: March 16, 2015 00:07 IST2015-03-15T23:55:43+5:302015-03-16T00:07:35+5:30

महादेवराव महाडिक : महापौर राजीनामाप्रकरणी पॅचवर्कचा प्रयत्न; कारभारी मात्र आक्रमक

We will not take any initiative with the Mushrif | मुश्रीफांशी वाकडे घेणार नाही

मुश्रीफांशी वाकडे घेणार नाही

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा दुरावा निर्माण होईल, असे कृत्य करणार नसल्याची ग्वाही आमदार महादेवराव महाडिक यांनी रविवारी दिली. याउलट नेत्यांचा मानस पायधुळी तुडवीत माजी महापौर सुनील कदम यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे महापौैरांच्या विरोधात ठराव आणणाऱ्या नगरसेवकांवरच कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे एकीकडे आमदार महाडिक ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी मुश्रीफ यांच्याशी ‘पॅचवर्क’ करण्याच्या प्रयत्नात असतानाच कारभारी मात्र आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.
आमदार हसन मुश्रीफ यांनी सूचित केल्याप्रमाणे ‘महापालिकेतील कारभाऱ्यांना लगाम घाला,’ या मागणीसाठी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार महाडिक यांची भेट घेतली. शिष्टमंडळासमोर भूमिका स्पष्ट करताना महाडिक म्हणाले, मुश्रीफ यांना नेहमीच आपले सहकार्य राहील. महापालिकेतील राजकारणाबाबत काही गैरसमज झाला असेल तर आज, सोमवारी मुंबईत त्यांची भेट घेऊ. याविषयी चर्चा करून गैरसमज दूर करू. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुश्रीफ यांच्याशी राजकीय संबंध कोणालाही बिघडवू देणार नाही.
आमदार महाडिक एका बाजूला मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेण्याची भाषा करीत आहेत. नेमके याउलट त्यांचे समर्थक कारभारी वागत आहेत. माजी महापौर सुनील कदम यांनी आयुक्तांना निवेदन देऊन नगरसचिव व नगरसेवकांवरच कारवाई करा, ते महापौरांना नाहक अडचणीत आणत असल्याचा कांगावा केला आहे. उघडपणे महाडिक हे हसन मुश्रीफ यांच्याशी प्रामाणिक राहण्याची भाषा करीत असले तरी त्यांचे समर्थक मात्र उघडपणे उलट भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे महाडिक यांचा संदेश कारभाऱ्यांपर्यंत कितपत पोहोचला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
‘गोकुळ’ व राजाराम कारखान्याची निवडणूक येत्या महिन्याभरात होत आहे. महाडिक यांच्याविरोधात माजी मंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ व ‘राजाराम’साठी विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सतेज पाटील यांची ताकद वाढू नये, याची काळजी महाडिक घेत आहेत. महापौरांच्या राजीनाम्यावरून आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बंड थोपविण्यासाठी महाडिक समर्थक नगरसेवक सरसावल्याचे चित्र आहे. यानंतर चिडलेल्या हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांना कारभाऱ्यांना रोखण्याचा सल्लाही दिला होता. ‘गोकुळ’ व ‘राजाराम’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांचा पवित्रा सावध आहे. त्यामुळेच ते मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेण्याची जाहीर भाषा करीत असतानाच त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र, त्याउलट भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.


महापालिकेतील राजकारणाबाबत काही गैरसमज झाला असेल तर आज, सोमवारी मुश्रीफांची मुंबईत भेट घेऊ. याविषयी चर्चा करून गैरसमज दूर करू. मात्र, त्यांच्याशी राजकीय संबंध बिघडवू देणार नाही.
- महादेवराव महाडिक, आमदार



आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी महाडिक यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत मुश्रीफ यांच्याशी दुरावा निर्माण होईल, असे कृत्य घडणार नसल्याचे महाडिक यांनी यावेळी स्पष्ट केले. - प्रा. जयंत पाटील


आघाडीचा सदस्यांना ‘व्हिप’
महापालिकेची आज सभा : माळवींचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव; सभा तहकूब की वादळी ?
कोल्हापूर : गैरवर्तणूक व अशोभनीय कृत्यांबद्दल महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करा, या मागणीचा ठराव आज, सोमवारी होणाऱ्या सभेत बहुमताने मंजूर व्हावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गटनेत्यांनी सभागृहात उपस्थित राहण्याबाबत ‘व्हिप’ (पक्षादेश) बजावला आहे. महापौर व त्यांच्या समर्थकांनी उत्साहाने बोलावलेली सभा त्यांच्यावर उलटविण्याची व्यूहरचना आखत तांत्रिक मुद्द्यांवर महापौरांची कोंडी करण्याची योजना आखली आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना श्रद्धांजली वाहून सभाच तहकूब करायची, त्यापुढे थेट बजेटच्या मंजुरीसाठीच सभा बोलावण्याचा मानस महापौर समर्थकांचा आहे.
दरम्यान, महापौरांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ‘तो’ ठरावच बेकायदेशीर असून नगरसचिवांसह संबंधित नगरसेवकांवरच कारवाई करा, अशी मागणी महाडिक समर्थकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पत्रांद्वारे केली आहे. त्यामुळे पडद्यामागील घडामोडी वेगावल्या आहेत. महापौर तृप्ती माळवी यांच्याविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीने उघडलेली आघाडी आता कायदेशीर व तांत्रिक मुद्द्यांवर येऊन ठेपली आहे. आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार मालोजीराजेंना मानणाऱ्या नगरसेवकांच्या पाठबळावर महापौरांनी उद्या, सोमवारी महासभा बोलावली आहे. उद्याची सभा कोरमसाठी आवश्यक २८ नगरसेवकांची उपस्थिती न लाभता रद्द झाल्यास लगेच दुसऱ्या दिवशी सभा बोलावून, तीही रद्द करून त्याच दिवशी तिसरी सभा बोलाविण्याचा डाव माळवीसमर्थक नगरसेवकांनी आखला होता.
सत्ताधारी आघाडीने पदास अशोभनीय वर्तन केल्याबद्दल महापौरांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव सभेपुढे ठेवला. या सभेला नगरसेवकांनी हजर राहावे, यासाठी रविवारी पक्षातर्फे ‘व्हिप’ही बजावला आहे. पक्ष व आघाडी जो निर्णय घेईल, त्याविरोधात नगरसेवकांना मतप्रदर्शन करता येणार नाही, असा आदेश पक्षातर्फे नगरसेवकांना बजावला आहे.
महापौर तृप्ती माळवी यांना कोणत्याही न्यायालयाने अद्याप दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे महापालिका अधिनियमातील कलम १३(१) (अ) नुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव करता येणार नाही. ठरावासाठी नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याचे नगरसेवक सुनील कदम यांनी म्हटले आहे.


कोंडी करण्याचा प्रयत्न
सुरुवातीस सभा व्हावी, यासाठी आक्रमक असलेले महापौर समर्थक नगरसेवक आता सभाच होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. पक्षातर्फे ‘व्हिप’ बजावून सभागृहात महापौरांविरोधात ठराव आणून त्यांची तांत्रिकदृष्ट्या कोंडी करण्याची तयारी सत्ताधारी नगरसेवकांनी केली आहे तर असा व्हिप बजावता येत नाही, असे महापौर समर्थकांचे म्हणणे आहे.
...अन्यथा कारवाई !
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक आज, सोमवारी सकाळी महापालिकेत घेणार आहे. सभेला नगरसेवकांनी उपस्थित राहावे, यासाठी यापूर्वीच निरोप देण्यात आले आहेत. सर्व नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर बंधपत्र लिहून दिले आहे. त्याद्वारे त्यांना सभागृहात आघाडीने घेतलेल्या निर्णयाविरोधात सभागृहात बोलता येणार नाही. आघाडीचा आदेश धुडकावणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाईल, असे गटनेता राजेश लाटकर व शारंगधर देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: We will not take any initiative with the Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.