सत्तेसाठी आम्ही भीक मागणार नाही
By Admin | Updated: January 10, 2016 00:59 IST2016-01-10T00:59:21+5:302016-01-10T00:59:21+5:30
मुश्रीफ यांचा पवित्रा : आता काँग्रेसनेच निर्णय घ्यावा; पैरा फेडला, आता सोबत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा

सत्तेसाठी आम्ही भीक मागणार नाही
कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे राष्ट्रवादी कॉँग्रेसने कॉँग्रेसच्या मदतीचा पैरा फेडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेत राष्ट्रवादीला सामावून घ्या, म्हणून वारंवार सांगत भीक मागायला आम्ही जाणार नाही. कॉँग्रेसनेच आता पुढाकार घेऊन राष्ट्रवादीला सोबत घ्यावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
शासकीय विश्रामगृहावर शनिवारी महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडल्या, त्यावेळी मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्येकवेळी कॉँग्रेसला मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळेच जिल्हा परिषदेतही एकत्रच राहावे, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. विधान परिषदेवेळी आम्ही जाहीर भूमिका त्यांच्यासमोर मांडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कॉँग्रेसचा राष्ट्रवादीवर राग होता. पी. एन. पाटील यांच्या हट्टापाई त्यांनी स्वाभिमानी संघटनेला सत्तेत घेतले. खरे तर स्वाभिमानी हा पक्ष कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शत्रूपक्ष आहे. तरीही आजसुद्धा त्यांच्या सोबतच कॉँग्रेसने सत्ता भोगली आहे. कॉँग्रेसच्या सतेज पाटील यांना निवडून आणण्यात राष्ट्रवादीने योगदान दिले. त्यामुळे सतेज पाटील यांनीच पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही भीक मागितल्यासारखे आता त्यांच्याकडे जाणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली. त्याचे भविष्यात काही परिणाम भोगावे लागतील का, असे विचारले असता मुश्रीफ यांनी अशा परिणामांचा विचार केला असून, त्या-त्या वेळी अशा परिणामांना तोंड देण्याचा प्रयत्न राहील; परंतु कॉँग्रेसला मदत केली आहे, हे त्यांनीही लक्षात ठेवावे. म्हणून जिल्हा परिषदेतील सत्तेत सामावून घ्यावे. प्रश्न एक दोन पदे मिळण्याचा नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
शरद पवार दोन दिवस दौऱ्यावर
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार १७ व १८ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्ह्यात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
तीन महिन्यांपूर्वी शरद पवार कोल्हापूरच्या धावत्या दौऱ्यावर आले होते. रविवारी (दि. १७) पुण्याहून दुपारी तीन वाजता शिरोळ येथे येणार आहेत. साडेतीन वाजता दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार
डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री पतंगराव कदम, खासदार प्रभाकर कोरे, खासदार प्रकाश हुक्किरे, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील उपस्थित राहणार आहेत.
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील विवेक इंजिनिअरिंग वर्क्सचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते साडेपाच वाजता होणार आहे. साडेसहा वाजता शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या उद्योजकांचा वार्तालाप असे कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि. १८) अकरा वाजता शेतकरी सहकारी संघाचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम, साडेबारा वाजता प्रायव्हेट हायस्कूल येथे कोल्हापूर अर्बन को-आॅप. बॅँकेच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील.
राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते धर्मसंकटात
कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे पाठवायच्या एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहावर मुलाखती पार पडल्या. पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अशा मिळून तब्बल नऊजणांनी आपल्याच नावाचा विचार करावा, अशी आग्रही भूमिका घेतली असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. पक्षासाठी मोठे योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे याविषयावर पुन्हा एकदा १५ जानेवारीला बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महानगरपालिका सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे एक स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यकर्त्याला पाठवायचे आहे. त्यासाठी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक असे मिळून नऊजण इच्छुक आहेत.
या नऊजणांची काय भूमिका आहे, त्यांचा या पदासाठी काय आग्रह आहे, हे जाणून घेण्याकरिता शनिवारी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी अध्यक्ष के. पी. पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आदिल फरास, प्रा. जयंत पाटील, विनायक फाळके, उत्तम कोराणे, अजित राऊत, अॅड. अशोकराव साळोखे, अशोकराव जाधव अशा नऊजणांनी पक्षाकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपल्या नावाचा विचार करावा म्हणून आग्रह धरला आहे. प्रत्येक इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती पार पडल्या.
सर्वच इच्छुकांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. उत्तम कोराणे व विनायक फाळके यांनी तर प्रत्येकी दोन-दोन नगरसेवक निवडून आणले आहेत. आर. के. पोवार व प्रा. जयंत पाटील यांनी उमेदवार ठरविण्यापासून ते निवडणुकीतील सर्व यंत्रणा हाताळण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडली आहे. इच्छुकांची आणि तेही मातब्बर कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मुलाखतीवेळी नेत्यांच्या समोरचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत होता. त्यामुळे शनिवारी कोणताही निर्णय झाला नाही.
उलट मुश्रीफ यांनी सर्वांना तुमच्यात एकमत करून जर नाव सुचविले, तर अधिक चांगले होईल, असे सुचविले. १५ जानेवारीला पुन्हा एक बैठक घेऊन स्वीकृत नगरसेवकपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. (प्रतिनिधी)