पूररेषा निश्चितीनंतर पुनर्वसनाचा आराखडा तातडीने बनवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:16+5:302021-09-09T04:29:16+5:30
गडहिंग्लज : पाटबंधारे खात्याकडून पूररेषा निश्चित झाली की, पुनर्वसनाचा आराखडा तातडीने बनवून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन ...

पूररेषा निश्चितीनंतर पुनर्वसनाचा आराखडा तातडीने बनवू
गडहिंग्लज : पाटबंधारे खात्याकडून पूररेषा निश्चित झाली की, पुनर्वसनाचा आराखडा तातडीने बनवून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन गडहिंग्लज विभागाचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिले.
अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी-घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीतर्फे आयोजित पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
वाघमोडे म्हणाले, अतिवृष्टीबाधितांचे सर्वेक्षण, नद्या-नाल्यांचे मॅपिंग, साचलेला गाळ काढण्यासह खोलीकरण करण्याबाबतच्या सूचना शासनाकडून आल्या आहेत. त्याचीही प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. तसेच एकही व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही, याची पूरग्रस्तांनी खात्री बाळगावी.
कॉ. संपत देसाई म्हणाले, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा ठोस आणि कालबद्ध कार्यक्रम ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संघर्ष समिती आणि प्रशासनात समन्वय साधून हे काम आपण पुढे नेऊया. पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे म्हणाले, पूरबाधित सर्व शासकीय कार्यालये नव्या जागेत हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
या बैठकीला सरपंच लोखंडे, पंचायत समिती सदस्य इराप्पा हासुरे, तहसीलदार दिनेश पारगे, प्रशांत देसाई, सिदगोंडा पाटील, चेतन लोखंडे यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींसह पूरग्रस्त उपस्थित होते.
चौकट :
घरबांधणीसाठी अनुदान द्या..!
पूरग्रस्तांची घरे नवीन संपादन कायद्याप्रमाणे ताब्यात घेऊन योग्य मोबदला द्या किंवा जुनी घरे तशीच ठेवून नवीन वसाहतीत भूखंड देऊन किमान १० लाख घरबांधणी अनुदान द्या, अशी मागणी पूरग्रस्तांनी बैठकीत केली.
चौकट :
शासकीय कार्यालयांना तातडीने जागा
अतिवृष्टी आणि पुरामुळे गावांमधील ग्रामपंचायत, अंगणवाडी, तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे नुकसान झाले असल्यास किंवा पूरबाधित क्षेत्रातील शासकीय कार्यालयांसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही प्रांताधिकारी वाघमोडे यांनी सांगितले.
फोटो ओळी : अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथील पूरग्रस्तांच्या बैठकीत प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्याधर गुरबे, संपत देसाई, तहसीलदार दिनेश पारगे आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०८०९२०२१-गड-०७