अपंग विकास महामंडळावर नसिमा हुरजूक यांना संधी देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:40+5:302021-01-17T04:22:40+5:30
कोल्हापूर : दिव्यांगामध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत करून समाजात पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या नसिमा हुरजूक या निरपेक्षपणे काम करत आहेत. त्यांच्या ...

अपंग विकास महामंडळावर नसिमा हुरजूक यांना संधी देऊ
कोल्हापूर : दिव्यांगामध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत करून समाजात पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या नसिमा हुरजूक या निरपेक्षपणे काम करत आहेत. त्यांच्या या उत्तुंग कार्याची दखल म्हणून त्यांना राज्य सरकारच्या अपंग पुनर्वसन विकास महामंडळावर संधी देऊ, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
नसिमा हुरजूक यांनी साहस डिसॅबिलिटी रिसर्च ॲन्ड केअर फाउंडेशन या नव्या संस्थेची स्थापना केली आहे, त्याचे औपचारिक उद्घाटन शनिवारी शाहू छत्रपती यांच्या हस्तेे केशवराव भोसले नाट्यगृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील होते. खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक मोहिते, सचिव तेज घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावूनही डॉक्टर झालेल्या मुंबईच्या रोशन शेख हिचा साहस पुरस्कार देऊन सत्कार केला.
नसिमा हुरजूक यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हिमालयासारखा पाठीशी उभा राहीन असे सांगून मुश्रीफ यांनी मुश्रीफ फाउंडेशनकडून एक लाखाची घोषणा केली. शाहू छत्रपती यांनी हुरजूक जिथे असतील तेथे चांगले काम होणार, असा विश्वास व्यक्त करून संस्थेला कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी हुरजूक यांच्या कार्याचा गौरव करताना नसिमादीदीनी समाज आणि दिव्यांगांना एकत्र जोडण्याचे केले. हे करताना स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. संस्थेचे नाव हेल्पर्स ठेवले, पण कांही कारणास्तव बाहेर पडायला लागले तरी आता त्यांनी साहस नावाचे लावलेले नवे रोपटेही चांगलेच बहरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
चौकट ०१
मुश्रीफ यांनी काढला चिमटा
या कार्यक़्रमाला अध्यक्ष म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बोलावले होते, पण ते येऊ शकत नसल्याने त्यांच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी संदेशाचे वाचन केले. यात नसिमाताई यांनी नव्या संस्थेचे शिवधनुष्य उचलले आहे, असा उल्लेख होता. यावरून मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांचे शिवधनुष्यावरही प्रेम बसल्याचे पाहून कौतुक वाटले, असा चिमटा काढला.
फोटो: १६०१२०२१-कोल-हुरजूक
कोल्हापुरात शनिवारी नसिमा हुरजूक यांच्या साहस फाउंडेशन या दिव्यांगासाठीच्या संस्थेचे उद्घाटन शाहू छत्रपती, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, तेज घाटगे, अभिषेक मोहिते यांच्या उपस्थितीत झाले. (छाया: आदित्य वेल्हाळ)