कोल्हापूर : स्व.पी.एन.पाटील यांनी काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केला नाही. राहुल पाटील आणि राजेश पाटील हे पी. एन. यांचा वारसा चालवत आहेत. हे दोन्ही बंधू माझी भेट घेणार असून त्यांची समजूत काढू, त्यामुळे काँग्रेस सोडून ते कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ व बाळासाहेब थोरात हे राहुल पाटील यांच्याशी बोलले असून हे दोन्ही बंधू मंगळवारी माझी भेटही घेणार असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी राहुल पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्ताचे खंडन केले.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. या पक्षप्रवेशाला भोगावती साखर कारखान्याच्या कर्जाची किनार असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.पाटील म्हणाले की, करवीर विधानसभा मतदारसंघात स्व.पी.एन.पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटात गावागावात संघर्ष आहे. पी.एन.पाटील यांनी काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे राहुल पाटीलही दुसरा विचार करणार नाहीत.
Kolhapur Politics: राहुल पाटील यांची समजूत काढू, ते काँग्रेससोबतच राहतील; सतेज पाटील यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:32 IST