दिल्लीतील आंदोलनाला बळ देण्यासाठी कोल्हापुरात लढा सुरूच ठेवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:29+5:302020-12-13T04:39:29+5:30
कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी कोल्हापुरातील लढा असाच तेवत ठेवू, असा निर्धार ...

दिल्लीतील आंदोलनाला बळ देण्यासाठी कोल्हापुरात लढा सुरूच ठेवू
कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी कोल्हापुरातील लढा असाच तेवत ठेवू, असा निर्धार मिरजकर तिकटी येथील सभेत करण्यात आला. आंदोलन पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
केंद्र शासनाने शेतकरीविरोधी तीन कायदे केले असून या विरोधात कोल्हापुरात लढा सुरू आहे. हा कायदा शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे घातक आहे. याची माहिती सर्वांना होण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि मावळा कोल्हापूर यांच्या वतीने शहरातील प्रमुख चौकात सभा घेण्यात येत आहेत. ऐतिहासिक मिरजकर तिकटी येथून शनिवारी याची सुरुवात झाली.
माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या आंदोलनासाठी मावळा कोल्हापूरने शहरात जनजागृती सभा आयोजित करून आंदोलनाची धग कायम ठेवली आहे. अशाच प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांच्या सहभागाने आंदोलन तेवत ठेवून दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्याचे काम करू.
टी. एस. पाटील म्हणाले, जमीन अधिग्रहण कायदा अशा प्रकारे लादण्याचा प्रयत्न झाला. त्याला तीव्र विरोध करण्यात आला. नव्याने केलेल्या तीन कायद्यांसाठीही अभूतपूर्व लढा उभा करून शेतकऱ्यांवरील संकट टाळू.
इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील म्हणाले, कोणतेही आंदोलन अथवा लढ्यात कोल्हापूरकर उतरले तर त्याची दखल देशाला घ्यावी लागते. या आंदोलनाची दखलही मोदी सरकाराला घ्यावीच लागेल. चंद्रकांत यादव, ‘आप’चे संदीप देसाई, अतुल दिघे, ॲड. अशोक साळोखे, नामदेव गावडे, संभाजी जगदाळे यांच्यासह मावळा कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी मनोगतातून मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला.
चौकट
सात दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा दिल्लीत धडक
शेतकऱ्यांवर अन्याय करून उद्योजकांना पोसण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. २० डिसेंबरपर्यंत कायदे मागे घ्यावेत अन्यथा दिल्लीत येऊन रस्ते बंद पाडू, असा इशारा जनता दलाचे रवी जाधव यांनी दिला.
फाेटो : १२१२२०२० कोल शेतकरी आंदोलन
ओळी : कोल्हापुरातील मावळा कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी येथे केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात सभा घेतली. यावेळी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, संदीप देसाई, सतीश कांबळे, रवी जाधव, चंद्रकांत यादव, बाबूराव चव्हाण, अतुल दिघे, उमेश पोवार, आदी उपस्थित हाेते.