चुकीचे जातीचे दाखले तत्काळ बदलून देऊ
By Admin | Updated: November 11, 2014 00:17 IST2014-11-11T00:15:34+5:302014-11-11T00:17:57+5:30
करवीर प्रांताधिकारी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आंदोलनाला यश

चुकीचे जातीचे दाखले तत्काळ बदलून देऊ
कोल्हापूर : करवीर प्रांत कार्यालयाकडून मराठा जातीचे दाखले देताना ‘मराठा (१४९)’ असा उल्लेख होता. जातीसमोर कंसात असा उल्लेख आल्याने जातपडताळणी कार्यालयाकडून हे दाखले जात वैधता प्रमाणपत्र करताना नाकारण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याकरिता मराठा महासंघाने आज, सोमवारी करवीर प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांच्या मागण्या मान्य करत या कार्यालयाकडून दिलेले दाखले परत घेऊन नवीन दाखले दिले जातील, असे आश्वासन पाटील यांनी महासंघाच्या आंदोलकांना दिले.
राज्यात मराठा आरक्षण निर्णय झाल्यानंतर करवीर प्रांत कार्यालयामार्फत मराठा समाजाचे दाखले देताना जातीसमोर कंसात (१४९) असा उल्लेख करण्यात आला होता. हा उल्लेख असल्याने जातपडताळणी कार्यालयाने चुकीचा दाखला म्हणून सुमारे चारशेहून अधिक मराठा जातीचे दाखले वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे अनेकांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. त्याचा विचार करून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रांताधिकारी पाटील यांची भेट घेऊन आम्हाला यासंदर्भात आंदोलन करण्यास भाग पाडू नका. आमचे दाखले त्वरीत बदलून द्या, अशी मागणी केली. त्यावर प्रांताधिकारी पाटील यांनी असे दाखले स्पॅनको या महा ई-सेवाअंतर्गत ‘महासेतू’साठी नेमलेल्या कंपनीकडून चुकीने वाटले गेले आहेत. त्यासाठी आॅनलाईन पद्धतीने या दाखल्यांमध्ये बदल करण्यासाठी प्रक्रिया चालू केली आहे. त्यामुळे वाटलेले जातीचे दाखले मूळ प्रतीसह परत करावेत. त्यानंतर चार ते पाच दिवसांत नवीन मराठा जातीचे दाखल देवू, असे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे आंदोलकांना अचंबित होण्याची वेळ आली. प्रथमच आंदोलनासाठी गेल्यानंतर तत्काळ अधिकाऱ्याने त्यावर निर्णय घ्यावा आणि ते काम हातावेगळे करावे, असा अनुभव प्रथमच आल्याचे सांगत पाटील यांच्या कामाबद्दल प्रशंसा केली.
यावेळी शंकर शेळके, शिवाजीराव ससे, महादेव पाटील, प्रकाश पाटील, संदीप पाटील, शैलजा पाटील, धनवंत डाफळे, नीलेश साळोखे, हेमंत घाग, प्रशांत बरणे, निखील जाधव, दिलीप सावंत,
शुभम सासने, शिरीष जाधव, मालती जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)