नागपंचमीसाठी कायद्यात बदल करू
By Admin | Updated: July 6, 2015 00:31 IST2015-07-05T23:33:20+5:302015-07-06T00:31:35+5:30
प्रकाश जावडेकर : आश्वासनानंतर शिराळा बंद मागे

नागपंचमीसाठी कायद्यात बदल करू
शिराळा : शिराळ्याच्या नागपंचमीसाठी हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल करून पुढील वर्षाची नागपंचमी शिराळकरांना पारंपरिक पद्धतीने साजरी करता येईल, असे ठोस आश्वासन केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी शिराळ्यातील शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळाने पुणे येथे जावडेकर यांची भेट घेतली. आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, विलास देशमुख, अॅड. भगतसिंग नाईक, सरपंच गजानन सोनटक्के यांच्यातर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. जावडेकर यांच्या आश्वासनानंतर व तालुक्यातील नेत्यांच्या आवाहनानंतर रविवारी दुपारनंतर शिराळा बंद मागे घेण्यात आला. आजपासून व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत.
यावेळी जावडेकर म्हणाले की, शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला हजारो वर्षांची परंपरा आहे. परंतु यापूर्वी चुकीचा कायदा झाल्यामुळे नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यास अडचणी येत आहेत. आता कायद्यात बदल करणार असून, त्यासाठी सुब्रह्मण्यम कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीद्वारे कायद्यात दुरुस्ती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशनात त्यास मंजुरी मिळेल. या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेतली जाईल. नागपंचमीची बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे या वर्षाची नागपंचमी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
चौथ्या दिवशीही बंद
नागपंचमीच्या प्रश्नावर रविवारी चौथ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर चक्री उपोषणात मुस्लिम संघटनेसह नागरिक सहभागी झाले होते. दि. २९ रोजी राजेंद्र माने यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्यांनी उपोषण सोडल्यावर तीन दिवसांपासून चक्री उपोषण चालू आहे. रविवारी मुस्लिम वेलफेअर संघटेनेचे अध्यक्ष डी. जी. आत्तार, के. आर. पठाण, फारूख शेख, हिदायत मुल्ला, शफी मुल्ला, खलील मोमीन, सिकंदर पठाण, जावेद नदाफ, फिरोज मुजावर, हारुण शेख, महंमद पठाण, जावेद काझी, दिलावर मोमीन, नौशाद सय्यद, मुबारक मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य महादेव कुरणे यांनी उपोषणात सहभाग घेतला होता.
आपणही उपस्थित राहू !
पुढील वर्षाची नागपंचमी ही नवीन कायद्याच्या बदलानुसार होणार आहे. त्यामुळे आपण स्वत: नागपंचमी उत्सवास हजर राहू, असे आश्वासनही प्रकाश जावडेकर यांनी दिले.