शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:04+5:302021-07-31T04:24:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरोली : पुणे - बंगळूर महामार्गावर शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करू, ...

शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करू
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोली : पुणे - बंगळूर महामार्गावर शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरोलीकरांना दिले. पूरपरिस्थितीचा दौरा करण्यासाठी आलेल्या पवार यांनी मंगळवारी महामार्गावरील पुराच्या पाण्याची पाहणी केली. यावेळी शिरोलीकरांच्यावतीने सरपंच शशिकांत खवरे यांनी सांगली फाटा येथे पिलरचा उड्डाणपूल उभा करण्याची मागणी पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने दळणवळण ठप्प होते. हजारो वाहने आणि प्रवासी अडकून पडतात. भविष्यात सहापदरी रुंदीकरणावेळी पुन्हा महामार्गावर १० फूट भराव टाकून उंची वाढवली जाणार आहे. असे झाले तर पंचगंगा नदीकिनारी असणारी गावे पुन्हा पाण्याखाली जातील, अशी भीती खवरे यांनी व्यक्त करत या महामार्गावर भराव न टाकता शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करावा, अशी मागणी केली. त्यावर पवार यांनी याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून शिरोली सांगली फाटा ते तावडे हाॅटेलपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभा करू, असे आश्वासन दिले.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे, पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कदम, मुन्ना सनदे, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, दीपक खवरे, राहुल खवरे, सतीश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो : ३० शिरोली अजित पवार
शिरोली सांगली फाटा येथे उड्डाणपूल उभा करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.