‘गडहिंग्लज’च्या घनकचरा प्रकल्पाची चौकशी करावी

By Admin | Updated: July 1, 2015 00:13 IST2015-07-01T00:13:51+5:302015-07-01T00:13:51+5:30

विरोधी आघाडी : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी

We should inquire about the 'solid waste' project of 'Gadhinglj' | ‘गडहिंग्लज’च्या घनकचरा प्रकल्पाची चौकशी करावी

‘गडहिंग्लज’च्या घनकचरा प्रकल्पाची चौकशी करावी

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४० लाख रुपये गुंतवून बसविलेली मशिनरी केवळ २० दिवस चालली. मशिनरी पुरविणाऱ्या मक्तेदारालाच ती मशिनरी चालविण्यास देण्यात आली आहे. या संशयास्पद व्यवहारात पदाधिकारी व प्रशासनाने संगनमताने अपहार केला आहे. त्यामुळे या ठेक्याची सखोली चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी जनता दल-जनसुराज्य आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. यामुळे नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांनी विरोध नोंदविलेला असतानाही ग्रीन फे्रंडस इको मॅनेजमेंट सर्व्हिसेस, हिरलगे यांची या कामाची ४३ लाख ८८ हजार ६०१ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. त्याचा करारही बेकायदा करण्यात आला. चाचणी अहवाल न पाहता या कामाचे बील अदा केल्यामुळे तांत्रिक लेखा परीक्षणाच्या अटींच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.
३१ मार्च २०१४ पासून आजतागायत ही मशिनरी केवळ २० दिवस चालविण्यात आली. प्रतीदिन १० टन कचरा विघटनाची क्षमता असतानाही २० दिवसांत केवळ २२ टन मातीसदृश्य खत तयार झाले. तरीदेखील मक्तेदाराला ४३ लाख ३५ हजार ३१३ रुपयांचे बील अदा केले. मशिनरी चालविण्यासाठी त्याच मक्तेदारास प्रतिमहिना १,१६,५०० रुपये दराने १५ मार्च २०१५ रोजी कामाचा आदेश देण्यात आला आहे.
ई-निविदेतील अट क्रमांक ८ नुसार निविदा धारकांना या कामाचा अनुभव नसल्यामुळे फेरनिविदा काढण्याची गरज होती. मात्र, १७ जून २०१३ च्या दरपत्रकाने फॅब्रिकेशन फर्म्सकडून दरपत्रक मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त तीन दरपत्रकांपैकी ‘ग्रीन फे्रंडस’चे ३९ लाख ९० हजारांचे दरपत्रक होते. त्याच दरपत्रकानुसार या कामाचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मंजुरी घेऊन चुकीच्या पद्धतीने पूर्वनियोजनानुसार काम दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
शिष्टमंडळात नगरसेवक बसवराज खणगावे, दादू पाटील, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर, बाळासाहेब वडर, राजेश बोरगावे, उदय पाटील व सरिता भैसकर यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: We should inquire about the 'solid waste' project of 'Gadhinglj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.