‘नकोशी’ बालके आम्ही सांभाळू
By Admin | Updated: May 24, 2016 01:01 IST2016-05-24T00:31:28+5:302016-05-24T01:01:33+5:30
मानवतेचा पुढाकार : बालकल्याण संकुलसह तीन संस्थांची ग्वाही

‘नकोशी’ बालके आम्ही सांभाळू
कोल्हापूर : नवजात बालिकेला प्लास्टिकच्या पिशवीतून टाकणे, ही घटना अतिशय क्लेशकारक आहे. ज्या पालकांना किंवा परिस्थितीने असहाय झालेल्या महिलांना मूल नको असेल त्यांनी आपली बालके बालकल्याण संकुलला द्यावीत, असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समिती व बालकल्याण संकुलाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाचवी मुलगी झाल्याने शुक्रवारी नवजात बालिकेला रस्त्यावर टाकले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे, महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर, बालकल्याण संकुलचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर व मानद सचिव पद्मजा तिवले यांनी हे आवाहन केले आहे.
डॉ. हेंद्रे म्हणाले, अशा घटना घडू नयेत यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल, दवाखाने, लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तसेच मेडिकलमध्येही हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अनाथ बालकांवर व अडलेल्या महिलेवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ काम करतील. याशिवाय विविध ठिकाणी व्याख्याने, पथनाट्य, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सुरेश शिपूरकर म्हणाले, गेली अनेक वर्षे बालकल्याण संकुलातर्फे अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. तसेच अडलेल्या महिलेला विनाअट प्रवेश दिला जातो. संस्थेने आजवर २०० हून अधिक बालकांना दत्तक देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे ज्या पालकांना मूल नको असेल, त्यांनी ते रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकण्याऐवजी बालकल्याण संकुलामध्ये आणून द्यावीत. रस्त्यावर बाळ टाकल्यास त्याच्या जिविताला धोका पोहोचतो. तुम्हांला बाळ नकोच असेल तर ते असे उघड्यावर टाकण्याऐवजी संस्थेत आणून द्या. त्याबध्दल गुप्तता पाळू.’
यावेळी पद्मजा तिवले म्हणाल्या, संस्थेत बालकांच्या पालकांची माहिती गुप्त ठेवली जाते. मूल देऊ इच्छिणाऱ्या स्त्रीचे बाळंतपण व सांभाळ या दोन्ही गोष्टी संस्था करते. परिषदेस डॉ. संदीप पाटील, डॉ. रवींद्र शिंदे, अनुराधा मेहता, पल्लवी कोरगांवकर, राजकुमार पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मदतीसाठी आमच्याकडे या...
अल्पवयीन, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, विवाहित, अविवाहित, बलात्कारित महिलांच्या पोटी मूल जन्माला आले की त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा महिलांचे महिला दक्षता समितीच्यावतीने समुपदेशन केले जाते, त्यांना आधार दिला जातो. अशा महिलांनी ९८२३१९२९६३, ९९७५५०९०७६ व ०२३१-२६२५४२९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तनुजा शिपूरकर यांनी केले.