कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही; आत्महत्या घटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:27+5:302021-04-30T04:30:27+5:30
कोल्हापूर : गेल्या सव्वादोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३०३ जणांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. माणसाच्या अपेक्षा ...

कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही; आत्महत्या घटल्या
कोल्हापूर : गेल्या सव्वादोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३०३ जणांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या, त्या पूर्ण करताना होणारी दमछाक व अपेक्षा पूर्ती न झाल्याने माणसांमध्ये नैराश्याची भावना वाढत जाऊन टोकाचा आत्महत्येचा निर्णय घेतल्याने पोलीस तपासात उघड झाले आहे. २०१९ मध्ये सुमारे ५७० जणांनी आत्महत्या केल्या, तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्रच बंद पडल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या, आर्थिक नुकसान झाले. जवळचे कोरोनाने गेले. माणसे व्यसनाधीन बनली. परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वत:ला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मकता वाढल्याने अनेकांनी जगण्याची उमेद हरवली. त्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या.
२०२० मध्येही आत्महत्येचे प्रमाण वाढले. या वर्षात माणसाला कोरोनाने घेरले. त्यातून वर्षभरात सुमारे ६१९ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या प्रारंभीच्या कालावधीत अनेकजण स्वत:ला सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले; पण गतवर्षीचा अनुभव पाहता आता हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही, सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांतील आत्महत्येच्या सरासरी प्रमाणात गेल्या तीन महिन्यांत कोरोना संकटामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. जानेवारी ते मार्च २०२१ अखेरपर्यंत ११४ जणांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.
पॉईंटर...
- २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या : ५७०
- २०२० मध्ये झालेल्या आत्महत्या : ६१९
- २०२१ जानेवारी ते मार्च : ११४
संकट माझ्या एकट्यावर नाही
कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही, तर सारेच अडचणीत आहेत, अशी भावाना प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून मार्ग काढणे, नैराश्येत मानसोपचार तज्ज्ञ अगर समुपदेशकांकडून उपचार घेणे, कौटुंबिक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे, अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी येऊ शकेल.
- डॉ. निखिल चौगले, मानसोपचार तज्ज्ञ
कोरोना संकटात १३ आत्महत्या
कोरोना संकटात अडचणीत सारेच जण आले; पण गेल्या वर्षभरात आर्थिक नुकसानीत पुन्हा उभे राहण्याची उमेद संपल्याच्या नैराश्येतून जिल्ह्यात तेरा जणांनी आत्महत्या केल्या. त्याशिवाय इतरही आत्महत्या झाल्या; पण त्यासाठी ठोस कारण प्रशासनाच्या हाती लागले नाही.