आम्ही सारे पानसरे...:हत्येच्या निषेधार्थ मोर्चा
By Admin | Updated: March 12, 2015 00:59 IST2015-03-12T00:57:42+5:302015-03-12T00:59:38+5:30
डाव्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा--हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांनी हातात लाल झेंडे, डोक्यावर लाल टोपी आणि अंगावर लाल कपडे परिधान करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. जणूकाही लाल महासागरचे चित्र

आम्ही सारे पानसरे...:हत्येच्या निषेधार्थ मोर्चा
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये निषेधार्थ डाव्या आणि पुरोगामी पक्ष-संघटनांनी बुधवारी राणीबाग ते आझाद मैदान धडक मोर्चा काढला. यावेळी हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांनी हातात लाल झेंडे, डोक्यावर लाल टोपी आणि अंगावर लाल कपडे परिधान करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. मोर्चा पाहून जणूकाही लाल महासागर आल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी करीत डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष- संघटनांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. दुपारी दीड वाजता भायखळ््यातील राणीबाग मैदानातून निघालेल्या या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते.
‘नथुराम प्रवृत्ती हाणून पाडा’, ‘आम्ही पानसरे’ अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत होत्या. दुपारी साडेतीन वाजता आझाद मैदानावर आलेल्या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. आम्हाला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नको. मात्र, त्यांना शांततावादी संघटना हव्या आहेत की, अशांतता पसरविणाऱ्या, हे त्यांनी ताबडतोब स्पष्ट करायला हवे. सरकार ज्या धर्मांध शक्तींना पाठीशी घालत आहे, त्याच उद्या सरकारमधील लोकांनाही टार्गेट करतील, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर), भारिप बहुजन महासंघ, एस.यु.पी.आय. (कम्युनिस्ट) लाल निशाण पक्ष, लाल निशाण (ले), भारिप (से), अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक मुक्ती दल. श्रमिक मुक्ती दल (ले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भाकप (लिबरेशन), नर्मदा बचाव आंदोलन या पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सामील झाले होते.
१८ मार्चला मुंबईत बैठक
पाच पुरोगामी नेत्यांचे शिष्टमंडळ १८ मार्चला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे अशोक ढवळे, भारिपचे प्रकाश आंबेडकर, श्रमिक मुक्ती दलचे भारत पाटणकर आणि शेकापचे एस. व्ही. जाधव यांचा समावेश असेल. या बैठकीनंतर नागपूरला एक भव्य मोर्चा काढण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
२२ मार्चला कोल्हापूरला जाहीर सभा
कोल्हापूरमध्ये २२ मार्चला ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.
जोपर्यंत पानसरेंचे मारेकरी आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. मुख्यमंत्री दिसतील, तिथे स्थानिक कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून त्यांना आंदोलनाची जाणीव करून देतील.
- भालचंद्र कानगो (राज्य सचिव, भाकप)
सर्व पुरोगामी विचारांच्या शक्तींनी संकुचितपणा सोडून एकत्र येण्याची गरज आहे. कारण हल्लेखोर आता पुरोगामी विचार करणाऱ्यांच्या घरांपर्यंत पोहोचले आहेत.
- जितेंद्र आव्हाड, आमदार
पानसरे यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही. मात्र, संपूर्ण कुटुंब अधिक जोमाने त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. सरकार आणि विरोधी पक्षांची तपासाबाबतची भूमिका न्याय्य वाटत नाही.
-मेघा पानसरे, कॉ पानसरे यांची सून.
दोन ज्येष्ठ विचारवंतांचे खून झाल्यानंतर हल्ल्याचा तपास पाहून सरकार आणि विरोधी पक्ष गंभीर असल्याचे वाटत नाही. सर्वसामान्य माणसाने त्यांच्या विचारस्वातंत्र्यावर घाला होत असल्याचे लक्षात घेण्याची गरज आहे.
- मुक्ता दाभोलकर (अंनिस, कार्यकर्ती)