एमसीसी विषयच बंद पडण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: December 9, 2014 23:17 IST2014-12-09T22:08:18+5:302014-12-09T23:17:51+5:30
शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : फाटके ड्रेस, उसवलेल्या बुटांमध्ये नाईलाजास्तव प्रशिक्षण

एमसीसी विषयच बंद पडण्याच्या मार्गावर
मुरगूड : शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर देशप्रेमाचे धडे बिंबविल्यास भावी नागरिक सक्षम तर बनतीलच; शिवाय देशाच्या अखंडत्वाला आपोआपच मजबुती येईल. या उद्दात्त हेतूने अगदी गाजावाजा करीत सुरू केलेला एमसीसी हा विषय शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वच शाळांमध्ये फाटक्या ड्रेसमध्ये व उसवलेल्या बुटांमध्ये नाईलाजास्तव मुले प्रशिक्षण घेत आहेत. राज्यात नवीनच सत्तेत आलेले युती सरकार याकडे गांभीर्याने पाहणार का? आणि या विषयाला नवसंजीवनी देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? हा प्रश्न एमसीसी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांना पडला आहे.
काही मोजक्याच हायस्कूलमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) हा विषय सुरू केला आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै १९९७ मध्ये गाजावाजा करीत सर्वच शाळांमध्ये महाराष्ट्र छात्र सेना अर्थात एमसीसी हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला.
दरम्यान, युतीचे शासन बदलले आणि राज्यात आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सुरुवातीला दिलेल्या ड्रेसचाच वापर आजही अनेक विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे काहींचे ड्रेस फाटले, तर काहींचे बूट तुटलेल्या अवस्थेतच दिसतात. काही शाळांमध्ये, तर शालेय युनिफॉर्ममध्येच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. सध्या एमसीसी कवायत स्पर्धा सुरू होण्याच्या लगबगी सुरू झाल्या आहेत; पण विषय शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मानसिकताच बदलली आहे. युनिफॉर्म नाही, शासकीय पातळीवर नोंद नाही, मग या स्पर्धांचा दिखावा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
शालेय अभ्यासक्रमात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून एमसीसीकडे पाहिले जाते; पण विविध साधने, सोयी, उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन योग्य साधने पुरवावीत.
- एस. एस. कळंत्रे, एमसीसी प्रशिक्षक, मुरगूड विद्यालय