‘महाड’च्या वाटेवर... कोल्हापूर!
By Admin | Updated: August 4, 2016 01:22 IST2016-08-04T00:55:55+5:302016-08-04T01:22:24+5:30
आयुष्य संपलेले ब्रिटिशकालीन चार पूल : वाहतुकीचा प्रचंड ताण; दुर्घटना झाल्यावरच जागे होणार का..?

‘महाड’च्या वाटेवर... कोल्हापूर!
प्रवीण देसाई, कोल्हापूर - -महाडमधील (जि. रायगड) ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री वाहून गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह बालिंगा, निढोरी व आजरा येथील शंभरी ओलांडलेल्या, पण वाहतुकीचा ताण झेलणाऱ्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. एखाद्या पुलाचे आयुष्यमान हे तांत्रिकदृष्ट्या किमान ७० ते ८० वर्षे इतके गृहीत धरले जाते. त्यानंतर पर्यायी पूल बांधणे गरजेचे आहे; परंतु शिवाजी पूलवगळता एकाही शंभरी गाठलेल्या पर्यायी पुलाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने वरिष्ठ स्तरावर पाठविलेला नाही. रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाची पुरातत्त्व खात्याची परवानगी केंद्र सरकार महाडसारखी दुर्घटना घडल्यानंतरच देणार काय? असा संतप्त सूर सर्वसामान्यांतून उमटत आहे.
साधारणत: ७० ते ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पर्यायी पूल बांधण्याची आवश्यकता असते. त्यानुसार जिल्ह्यातील शिवाजी पूल, व्हिक्टोरिया, पेरिस व रिव्हज या पुलांना पर्यायी पूल बांधण्याची गरज आहे. शिवाजी पूलाला पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरू असून जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम हे केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या परवानगीअभावी गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे महाडची दुर्घटना घडल्यानंतर शिवाजी पुलाच्या प्रश्नांने चांगलीच उसळी घेतली.
जीवितहानी झाल्यानंतरच केंद्र सरकारचे डोळे उघडणार आहेत का? कागदी घोडे नाचवून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ आता तरी थांबणार का? असा संतप्त सवालही सर्वसामान्यांतून विचारला गेला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने निढोरी, बालिंगा व व्हिक्टोरिया या पुलांना पर्यायी पूल बांधावेत, असा कोणताही प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविलेला नाही. या पुलांना कोणताही धोका नसून ते सुस्थितीत असल्याचा या खात्याचा दावा आहे.
शिवाजी पुलास शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश सरकारकडून पत्र पाठवून त्याची कल्पना दिली आहे. पुलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक यंत्रणेकडे सोपविण्यात आली. तशी कल्पना उर्वरीत पुलांबाबत ब्रिटिश सरकारकडून देण्यात आली नसल्याचे या खात्याकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाकडून पुलांचा आढावा
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सतर्कतेच्या सूचना देत जिल्ह्यातील पुलांची माहिती मागविली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण विभागाकडून सर्व माहिती राज्य सरकारला पाठविण्यात आली.
जिल्ह्यातील मोठे पूल
सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) (कागल, हातकणंगले, करवीर, शिरोळ) : अर्जुनवाड, दिनकर यादव पूल, चिकोत्रा, निढोरी, इचलकरंजी नवीन पूल, इचलकरंजी जुना पूल, न्यू प्रयाग पूल, एमआयडीसी पूल, सिद्धनेर्ली, शिरढोण, रुई, औरवाड, सांगरूळ, महे, हळदी, कापशी.
सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) (भुदरगड, राधानगरी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड) : सरवडे, गारगोटी, घटप्रभा, ताम्रपर्णी, व्हिक्टोरिया, मुत्नाळ, बिद्री, भडगाव, कूर, चिकोत्रा, अडकूर, बिद्री (नवीन), ताम्रपर्णी, इब्राहिमपूर, मोरवल, ताम्रपर्णी (कोवाड), राशिवडे.
बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प) (शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा) : कडवी, माण, मौसम, रूपनी, साळवण, बालिंगा, कोडोली, कासारी, शित्तूर, माजगाव, मल्हारपेठ, गोटे, सरुड.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील व्हिक्टोरिया, पेरिस व बालिंगा या पुलांना शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. हे पूल भक्कम असून त्यांना कोणताही धोका नाही. पावसाळ्यापूर्वी म्हणजे एप्रिल ते मेदरम्यान यासह इतर सर्व पुलांची पाहणी करण्यात आली आहे.
- सदाशिव साळुंखे, अधीक्षक अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर विभाग
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला कोणताही धोका नाही. असे असले तरी पर्यायी पूल बांधला जात आहे. हे काम सध्या पुरातत्त्व खात्याच्या परवानगीअभावी रखडले असून, या संदर्भात १२ आॅगस्टला दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे.
- आर. के.बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,
कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावर पंचगंगा नदीवरील १३४.८० मीटर लांबीच्या पर्यायी शिवाजी पुलासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मार्च २०१३ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. अठरा महिन्यांत हे काम पूर्ण करायचे होते; परंतु पुरातत्त्व खात्याच्या परवानगीअभावी ते रखडल्याने या कामासाठी ३१ मार्च २०१६ रोजी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले असून यावर १० कोटी रुपये खर्च झाले आहेत. या पुलाचे एकूण तीन गाळे आहेत. त्यांपैकी दोन गाळ्यांचे काम पूर्ण झाले असून कोल्हापूरच्या बाजूकडील एका गाळ्याचे काम राष्ट्रीय स्मारक समितीच्या परवानगीअभावी रखडले आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच हे काम सुरू होणार आहे.
शिवाजी पूल वाहून जाण्याची वाट पाहायची काय?
महाड घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावरही उमटले. सरकारला या भावना कळाव्यात यासाठी दिवसभर ‘महाड गावचा पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला.... मग आता कोल्हापूरचा शिवाजी पूलसुद्धा वाहून जायची वाट पाहायची काय? केव्हा होणार नवीन पुलाचे काम पूर्ण...?’ असे संदेश दिवसभर व्हॉट्स अॅपवरून फिरत होते.