केएमटी 'जनता गाडी'च्या मार्गावर

By Admin | Updated: December 16, 2014 23:49 IST2014-12-16T23:11:17+5:302014-12-16T23:49:57+5:30

‘एसटी’च्या सेवेला खो : केएमटीला दिवसात ५० हजारांचा फायदा, सहा बसेस सुरू

On the way to KMT 'Janataanadi' | केएमटी 'जनता गाडी'च्या मार्गावर

केएमटी 'जनता गाडी'च्या मार्गावर

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एस. टी. महामंडळास महापालिका हद्दीत प्रवासी वाहतुकीला मज्जाव केला. यानंतर एस.टी.ची जनता गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून जोर धरू लागली. मात्र, आरटीओंच्या या निर्णयाने ‘केएमटी’ला आज, मंगळवारी एका दिवसात ५० हजारांचा फायदा झाला. प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी ‘केएमटी’नेही नव्याने सहा बसेस जनता गाडीच्या मार्गावर सुरू केल्या. तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या २५ नव्या बसेसमुळे ‘जनता’ प्रवास आणखी सुखकर व जलद होईल, अशी ग्वाही ‘केएमटी’चे व्यवस्थापक संजय भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पालिकेच्या हद्दीत नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणारी एस.टी.ची जनता गाडी बंद करावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटना व ‘केएमटी’ प्रशासनाची होती. याबाबत आरटीओ लक्ष्मण दराडे यांच्याकडून एस.टी. प्रशासनाला ही सेवा बंद करण्याबाबत दीड वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. तरीही एस.टी.ने जनता सेवा सुरूच ठेवली होती.
अवैध जनता गाडी बंद करण्याबाबत एका बाजूला रिक्षा संघटनांची आंदोलने व ‘केएमटी’ची जोर, तर दोन रुपयांची स्वस्त जनता गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी, अशा कचाट्यात सापडलेल्या आरटीओ दराडे यांनी कायद्याचा बडगा उगारत एस.टी.ची अवैध सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रवाशांतून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, ही गाडी बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच ‘केएमटी’ला हक्काचे उत्पन्न मिळणार आहे. (प्रतिनिधी)


‘केएमटी’च्या ताफ्यात नवीन १३० बसेसची भर पडणार आहे. सर्व बसेसच्या मार्गांचे नियोजन तयार आहे. कोणत्याही मार्गावरील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागणार नाही. जनता गाडीची उणीव ‘केएमटी’ भरून काढेल.
- संजय भोसले
(व्यवस्थापक केएमटी)
‘केएमटी’ किंवा रिक्षाने जाण्यासाठी मला जादा पैसे मोजावे लागतात. कागल-रंकाळा बसचे शहरांतर्गत थांबे बंद करताना प्रशासनाने जादा गाड्यांचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, दोन दिवसांपासून अन्य पर्यायी व्यवस्थेमुळे मोठा त्रास होत आहे.
- बाळू माळी, विद्यार्थी



मोटार वाहन कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या शहरात एस.टी.ला स्थानिक सेवा देण्याची परवानगी देता येत नाही. त्यामुळे नियमानुसारच जनता गाडी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
- लक्ष्मण दराडे (प्रादेशिक परिवहन अधिकारी)

Web Title: On the way to KMT 'Janataanadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.