‘होसूर’चा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: July 27, 2014 23:01 IST2014-07-27T21:55:24+5:302014-07-27T23:01:05+5:30
शिक्षकाने दिली विनामूल्य जमीन

‘होसूर’चा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर
संजय पाटील : कोवाड , विविध आंदोलनांच्या माध्यमातून गेली दोन वर्षे सतत गाजत असलेल्या होसूर (ता. चंदगड) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. केवळ गावच्या पाणीप्रश्नासाठी येथील शेतकरी बी. बी. नाईक यांनी विनामूल्य लाखमोलाची जमीन दिल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कोवाड-बेळगाव मार्गावर कर्नाटक सीमारेषेनजीक होसूर गाव वसले आहे. १४०० लोकसंख्या असणाऱ्या या गावाला केवळ पाणीप्रश्नाने हैराण केले आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावरील किटवाड, कर्नाटकातील बेकीनकेरे व शेतवडीतील खासगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.
यावर पर्याय म्हणून किटवाड लघुपाटबंधारे तलावातून ३३ लाखांची ‘जलस्वराज्य’ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, या योजनेत प्रचंड दोष राहिल्याने ही योजनाच पूर्णपणे निकामी झाली. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावामध्ये नवीनच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्याचा निर्धार केला असून, तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहे. पहिल्या योजनेचा अनुभव लक्षात घेता ही योजना सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पूर्ण करणे गरजेचे आहे. मागील जलस्वराज्य योजनेतील त्रुटी दूर केल्यास व योजना पूर्णत्वासाठी प्रयत्न केल्यास होसूरकरांना निश्चितच स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकते.
शिक्षकाने दिली विनामूल्य जमीन
या योजनेमध्ये तलाव व गावातील अंतर व चढ विचारात घेता मध्यंतरी पाणी लिफ्ट करावे लागणार आहे. मात्र, जिथे लिफ्ट करावे लागणार तिथे जागेची अडचण होती. मात्र, गावातील प्रगतशील शेतकरी बी. बी. नाईक या शिक्षकाने गावच्या पाणीप्रश्नासाठी विनामूल्य गुंठाभर जमीन दिल्याने ही अडचणसुद्धा दूर झाली आहे.