साईडपट्ट्या नसल्याने मृत्यूचाच मार्ग
By Admin | Updated: December 4, 2014 00:37 IST2014-12-04T00:37:09+5:302014-12-04T00:37:09+5:30
कोल्हापूर-गगनबावडा रस्ता : अवघ्या सात महिन्यांत उखडला, सखोल चौकशीची मागणी

साईडपट्ट्या नसल्याने मृत्यूचाच मार्ग
प्रकाश पाटील / कोपार्डे
कोल्हापूर-गगनबावडा मार्ग हा कोल्हापूर शहराला जिल्ह्याचा पश्चिम भाग जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या रस्त्यावरुन प्रशासकीय कामांबरोबर शिक्षण, व्यवसायासाठी दररोज प्रवास करणारा एक मोठा वर्ग आहे. त्याशिवाय याच मार्गावरून पाच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक केली जाते; पण खड्डेमय अरुंद रस्त्याबरोबरच साईडपट्टया नसल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अनेक विचित्र अपघात या रस्त्यावर घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
या राज्य मार्गांची लांबी ५४ किलोमीटर आहे. साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले, की अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमचे चित्र पाहायला मिळते. रस्त्यात खड्डे, रस्त्याच्या बाजूपट्ट्या भरल्या न गेल्याने अवजड वाहनधारक रस्त्यावरून वाहन बाजूला घेण्यास तयारच नसतात. अवजड वाहने अगदी कमी वेगानेच चालवावी लागतात. त्यात उसाने भरलेले ट्रक, ट्रॉली व बैलगाड्या यांचे प्रमाण मोठे असल्याने या मार्गावरून वाहन चालविताना खड्डा चुकविण्याच्या नादात चालक आपली बाजू सोडून विरुद्ध दिशेला जातो. यामुळे अनेकवेळा विचित्र अपघात घडत असून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तसेच या खड्यांमुळे अनेक वाहने खराब झाल्याची पहावयास मिळतात.
कोपार्डे ते कळे (ता. पन्हाळा) या मार्गावर अनेक ठिकाणी बी.बी.एम.चा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याला कारपेटचा मुलामाच दिला गेलेला नाही. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, हा रस्ता पाच मीटरऐवजी सात मीटरचा करण्यात येणार आहे. यासाठी कारपेट थांबविण्यात आल्याचे सांगितले. मात्र, बी.बी.एम. पूर्ण उखडले असून, हे काम मार्च व एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आले होते.
केवळ सात महिन्यांत रस्ता उखडला असून, तात्पुरती मलमपट्टी करुन रस्त्याच्या कामाची बिले उचलली गेल्याचा प्रकार आहे. संबंधित कामातून कोट्यवधींचा मलिदा ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांनी मिळविला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबतची चौकशी होण्याची मागणी जनतेतून होत आहे.