निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट

By Admin | Updated: June 4, 2016 00:37 IST2016-06-03T23:12:25+5:302016-06-04T00:37:23+5:30

नागरिकांची धावपळ : ट्रान्स्फॉर्मर जळाल्याने व्यत्यय

Waterproofing in half the city | निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट

निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के.व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे शहरातील ए, सी व डी वॉर्डांतील पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्णपणे खंडित झाला. सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे, त्यात पुन्हा तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांना सलग दोन दिवस पाणी मिळाले नाही.
१ एप्रिलपासून शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. याचे योग्य नियोजन झाले असल्याने पाणीटंचाईच्या काळातसुद्धा शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत आहे. परंतु, गुरुवारी सायंकाळी शहर परिसरात जोरदार वाऱ्यापाठोपाठ विजांचा कडकडाट आणि वळीव पाऊस पडल्याने बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के.व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर शॉर्टसर्किट होऊन अचानक जळाला. या अनपेक्षित घटनेने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला.
बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील प्रक्रिया झालेले पाणी चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत सोडले जाते. त्यासाठी हा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला होता. चंबुखडीची टाकी रात्रभर भरली जाते आणि पहाटे तीन वाजल्यापासून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे ही टाकीच भरता आली नाही. परिणामी, शहरातील ए, सी व डी अशा तीन प्रमुख वॉर्डांना शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. या तीन वॉर्डांत सुमारे साडेतीन ते चार लाख लोकवस्ती आहे.
महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच भाड्याने घेतलेला ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे चंबुखडी येथील टाकी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आज, शनिवारपासून शहरात नियमित पाणीपुरवठा होईल, असे मनपा जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले.
सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. ज्या भागात गुरुवारी पाणी मिळाले नाही, त्या भागातील नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशीही पाणी मिळाले नाही. त्यामुळे उन्हाळा संपता संपता शहरवासीयांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याची झळ सोसावी लागली. दरम्यान, ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही, तेथे टॅँकरद्वारे पाणी देण्यात आले. परंतु, त्यावरही मर्यादा होत्या. (प्रतिनिधी)


वळीव पावसाने बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के. व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर शॉर्टसर्किट होऊन जळाला.
गुरुवारी रात्रीपासूनच भाड्याने घेतलेला ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम हाती घेतले.

Web Title: Waterproofing in half the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.