पंचगंगेला जलपर्णीची लागण
By Admin | Updated: December 26, 2014 00:53 IST2014-12-25T22:16:41+5:302014-12-26T00:53:07+5:30
तेरवाड बंधारा : वेळीच जलपर्णी हटावची मोहीम आवश्यक

पंचगंगेला जलपर्णीची लागण
गणपती कोळी - कुरुंदवाड -पंचगंगा नदीत उन्हाळ्यात प्रदूषित पाण्याबरोबर जलपर्णीही प्रमुख समस्या बनते. उन्हाळ्यापूर्वीच नदीमध्ये जलपर्णी डोके वर काढत असून, हळूहळू नदी व्यापत आहे. तेरवाड बंधारा आदी ठिकाणी तिचे अस्तित्व दिसत आहे. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून जलपर्णी हटाव मोहीम राबविण्याची गरज आहे.
पंचगंगा नदी शिरोळ, हातकणंगले तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. मात्र, या नदीकाठावर वाढलेले औद्योगिकीकरण, कोल्हापूरसह इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित बनली आहे. या नदीमध्ये उन्हाळ्यात धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने व सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाण्याचा प्रवाह वाढल्याने विशेषत: उन्हाळ्यात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनते. या दूषित पाण्याबरोबरच जलपर्णीची समस्या गंभीर बनत आहे.
हिवाळ्यामध्ये जलपर्णीचे पाण्यात रोपण होऊन नदी संपूर्ण जलपर्णीने व्यापून टाकते. सुमारे चार ते पाच फूट जाडीचा थर तयार होतो.
नदीत पसरलेल्या जलपर्णीच्या बियाणांचे रोपामध्ये रूपांतर होत आहे. जलपर्णी पाण्यावर येत असून, हळूहळू संपूर्ण नदी व्यापत आहे. जलपर्णीने एकदा घट्ट आवळले की, ती हटविणे शक्य होत नाही. त्यासाठी पावसाळ्यातील महापुराचीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.