पाण्यासाठी महिलांचा रूद्रावतार
By Admin | Updated: April 3, 2015 00:37 IST2015-04-03T00:00:56+5:302015-04-03T00:37:02+5:30
नगरसेविकेविरोधात संताप : टेंबलाईवाडीत आठवडाभर पाण्याचा ठणठणाट; रास्ता रोको, टायर पेटविल्या

पाण्यासाठी महिलांचा रूद्रावतार
कोल्हापूर : टेंबलाईवाडी परिसरासह चितोडिया भागात आठवडाभर पाण्याचा ठणठणाट झाल्याने अखेर गुरुवारी दुपारी नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात शंखध्वनी केला. टेंबलाईवाडी - उचगाव या रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको करून टायर पेटवून, भांडी ठेवून संताप व्यक्त केला. त्यामुळे या मार्गांवर सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. हा प्रकार समजताच उपमहापौर मोहन गोंजारे, प्रभागाच्या नगरसेविका रोहिणी काटे आल्या. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत येथून न हलण्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
टेंबलाईवाडी परिसरात गत दोन ते अडीच वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. विशेषत: श्रीराम कॉलनी, पाटील गल्ली, तुळजाभवानी व खतोबा कॉलनी या भागात गेल्या आठ दिवसांपासून जास्त प्रमाणात पाणीच येत नव्हते. या विरोधात गुरुवारी टेंबलाईवाडी विद्यालयाजवळ सर्व नागरिक रस्त्यावर जमले. रस्त्याच्या दुतर्फा येणारी वाहतूक बंद केली. हा प्रकार समजताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे यांच्यासह पोलीस याठिकाणी आले. त्याचबरोबर महापाािलकेचे अधिकारी व पदाधिकारीही आले. गुढीपाडव्यापासून पाणी येत नाही. अक्षरश: पाण्यासाठी भटकावे लागते, तसेच पाण्याचा टँकर येत नाही, आम्ही काय करायचे?, लोकप्रतिनिधींना सांगूनही त्याकडे ते डोळेझाक करीत आहेत, अशा व्यथा मांडत ‘आम्हाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही’ अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली. त्यावर नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले परंतु, नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उपमहापौर मोहन गोंजारे, नगरसेविका रोहिणी काटे याठिकाणी आले. १५ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन नागरिकांना काटे यांनी दिले. त्यानंतर जलअभियंता मनीष पवार घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
दरम्यान, याच भागातील चितोडिया समाज परिसरात गेले चार दिवस पाणी येत नसल्याचा उद्रेक झाला. येथील लोकांनी रस्त्यावर टायरी पेटवून तसेच लाकडे, भांडी ठेवून आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली. रोज पहाटे तीन वाजता पाणी येते. त्यामुळे आम्ही केव्हा पाणी भरणार, अशी विचारणा पवार यांच्याकडे करीत एकही दिवस पाण्याचा टँकर येथे येत नाही, अशा तक्रारी पोटतिडकीने मांडल्या.
आंदोलनात हौसाबाई कांबळे, प्रभावती बोंगाळे, सुमन घाटगे, शोभा रेडेकर, शारदा रेडेकर, जया मेथे यांच्यासह चितोडिया समाजातील सज्जनसिंग, रेश्मा भोसले, उषा भोसले, सारिका चौगुले, विजयमाला चौगुले, सचिन चौगुले, विमल चौगुले, आदींचा सहभाग होता. दरम्यान, अधिक माहिती घेण्यासाठी जलअभियंता पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
ताराराणी मार्केट कार्यालयावरही धडक...
चितोडिया समाजातील महिला गुरुवारी सकाळी महापालिकेच्या कावळा नाका येथील ताराराणी मार्केट कार्यालयात पाणी येत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या; पण तेथे काही उपयोग झाला नाही. रणरागिणींनी टेंबलाईवाडी येथे उचगाव टोलनाक्यासमोर टायर पेटवून व रस्ता रोको केला.
ताराराणी मार्केट कार्यालयावरही धडक...
चितोडिया समाजातील महिला गुरुवारी सकाळी महापालिकेच्या कावळा नाका येथील ताराराणी मार्केट कार्यालयात पाणी येत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या; पण तेथे काही उपयोग झाला नाही. रणरागिणींनी टेंबलाईवाडी येथे उचगाव टोलनाक्यासमोर टायर पेटवून व रस्ता रोको केला.