रूकडी येथील बोगद्यात पाणी, वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:54+5:302021-06-18T04:16:54+5:30
रूकडी माणगाव : रूकडी येथे रेल्वे फाटकशेजारी बांधण्यात आलेल्या नवीन बोगद्यात बुधवारी पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली. ...

रूकडी येथील बोगद्यात पाणी, वाहतूक ठप्प
रूकडी माणगाव : रूकडी येथे रेल्वे फाटकशेजारी बांधण्यात आलेल्या नवीन बोगद्यात बुधवारी पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली. बोगद्याच्या समस्येविषयी वारंवार आवाज उठवूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या बोगद्याची दुरुस्ती न झाल्यास (दि. २४) जून रोजी रेल्वे स्थानकासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रा. प. सदस्य शीतल खोत व शमुवेल लोखंडे यानी दिला आहे.
रूकडी गाव लोहमार्गामुळे दोन भागांमध्ये विभागले आहे. गावातून ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागतो. तसेच हा मार्ग जवळपास सात ते आठ गावांना जोडणारा असून प्रमुख बाजारपेठकडे जाणारा मार्ग आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वीच मार्ग बंद करून नवीन बोगदा मार्ग तयार केलेला आहे. या बोगद्याची लाईट व्यवस्था, दोन्ही बाजूला संरक्षक भिंती, सांडपाण्याची व्यवस्था व पावसाळ्यातील पाणी निचराचे योग्य ती व्यवस्था न करता बोगदा मार्ग खुला केला आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे बोगद्यात चार ते पाच फूट पाणी साठल्याने गावाचा उत्तर बाजूकडील संपर्क तुटला असून साठलेल्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. अनेकांच्या दुचाकी मधेच बंद पडल्या तर चारचाकी वाहनांचे प्रवास या बोगद्यात ठप्प झाली. या बोगद्यात साठणाऱ्या पाण्याचा योग्य निचारा करावा; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा रेल्वे विभागास ग्राम. प. सदस्य शीतल खोत व शमुवेल लोखंडे यांनी निवेदनाद्वारे दिले होता.
यानंतर तत्काळ रेल्वे प्रशासन किरकोळ डागडुजी करत पाणी निचराची व्यवस्था केली होती. परत हा बोगदा पाण्याने भरल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बोगद्यतील कायमचा पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करावेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी रूकडी रेल्वे स्थानकात उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आले आहे.
१७ रूकडी बोगदा
फोटो : रूकडी येथे बोगद्यात बंद पडलेले दुचाकी काढताना शीतल खोत, शमुवेेल लोखंंडेसह नागरिक. रूकडी येथील बोगद्यात पाणी, वाहतूक ठप्प.