पाणीपुरवठा तीस टक्क्यांनीकमी
By Admin | Updated: February 28, 2016 00:27 IST2016-02-28T00:27:03+5:302016-02-28T00:27:03+5:30
शहरातील परिस्थिती : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी घटली ; पुरवठा विस्कळीत

पाणीपुरवठा तीस टक्क्यांनीकमी
कोल्हापूर : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे दोन दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यात तीस टक्के कपात झाली असून, शहराच्या ए, बी तसेच ई वॉर्डांतील पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण झाला आहे.
उद्या, सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जलसंपदा विभागाने दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणातील पाणी भोगावती व पुढे पंचगंगा नदीत सोडले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली. शिंगणापूर बंधाऱ्याजवळ ही पातळी कमी झाली. त्यामुळे पाणी उपसा कमी झाला. या बंधाऱ्याजवळील चार पंपांपैकी दोनच सुरू आहेत, तर कसबा बावडा येथील जलशुद्धिकरण केंद्राकडे जलवाहिनीद्वारे नेण्यात येणाऱ्या पाण्यातही पंचवीस टक्के कपात झाली. त्यामुळे पुईखडी व कसबा बावडा येथील जलशुद्धिकरण केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी वॉर्डांतील पूर्ण भाग आणि ई वॉर्डातील निम्म्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. तेथे कमी दाबाने कमी पाणी मिळाले. राधानगरीतून ५०० क्युसेक्स पाणी सोडले असून, ते शनिवारी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत येईल. सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.
टँकरने पुरवठा : दोन वॉर्डांत परिणाम नाही
बालिंगा उपसा केंद्राकडे नागदेववाडी डोहातून पाणी घेण्यात आले, त्यामुळे बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. त्यामुळे ए वॉर्डाचा काही भाग तसेच सी व डी वॉर्डांतील पाणीपुरवठ्यावर कसलाही परिणाम जाणवला नाही. विशेषत: ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, त्या भागात मागणी होताच पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देण्यात येते होते. एकूण आठ टॅँकर त्यासाठी तैनात करण्यात आले होते. जरी पाणीपुरवठ्यात तीस टक्के कपात झाली असली तरी त्याची फारशी तीव्रता शहरवासीयांना जाणवली नाही.